जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी नियोजन प्रकल्पांचे बळकटीकरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणार प्रकल्प

मुंबई,३१ मार्च  /प्रतिनिधी :- जिल्ह्यातील विकासकामांचा गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी तसेच जिल्हा नियोजन प्रकल्पांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे जिल्हा नियोजन प्रकल्पासंदर्भात जागतिक बॅकेच्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यावेळी क्षमता बांधणी आयोगाचे सदस्य प्रवीण परदेशी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, जागतिक बँकेचे अधिकारी विक्रम मेनन, हून साहिब सोह, भावना भाटिया, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जिल्हा नियोजन प्रकल्पांच्या बळकटीकरणासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणारा प्रकल्प अत्यंत उपयुक्त आहे. जागतिक बँकेसोबत काम करण्याची मोठी संधी राज्याला उपलब्ध झाली असल्याचे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

विकासासाठी जिल्ह्यांनी निश्चित धोरण ठरवणे, जिल्ह्याच्या सक्षम बाजू तसेच कमकुवत बाजू यांचा अभ्यास, जिल्हा विकासाचे महत्त्वाचे केंद्र मानून काम करण्यावर भर, आर्थिक विकासाला सहाय्यभूत ठरण्यासाठी जिल्ह्याला सक्षम करणे, जिल्ह्याचा शाश्वत विकास करणे, नागरिक केंद्रीत धोरण, समाजाचा सहभाग वाढवणे, माहितीचे सुसूत्रीकरण व नियोजनाचे बळकटीकरण या मुद्यावर प्रामुख्याने भर देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.