खंडाळा येथे राष्ट्रीय महामार्गावर झेंडा लावण्यावरून दोन समाजात तेढ ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वैजापूर ,२९ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात राष्ट्रीय महामार्गावर झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन समाजात तेढ निर्माण झाला असून या प्रकरणी दोन्ही समाजातील पांच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वैजापूर उपविभागाच्या सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने खंडाळा येथे भेट दिली व दोन्ही गटांच्या शांतता समितीची बैठक घेतल्याने वातावरण निवळले आहे.

सरकारतर्फे पोलिस कॉन्स्टेबल विजय भोटकर यांनी फिर्याद दिली.वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे दोन वर्षांपुर्वी एका समाजाच्या काही व्यक्तींनी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध झेंडा बसविला होता. त्यानंतर 25 मार्च रोजी खंडाळा येथील त्याच ठिकाणी झेंड्याच्या बाजुला फलक लावले.यावर दुसऱ्या धर्माच्या नागरिकांनी आक्षेप घेतला त्यामुळे दोन्ही गटात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

त्याची दखल घेत सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी, पोलिस निरीक्षक संजय लोहकरे, एपीआय राम घाडगे, बीट अंमलदार मोईस बेग, गोपनीय शाखेचे विजय भोटकर यांनी खंडाळा गावात जाऊन शांतता समितीची भेट घेतली. त्यानंतर वाद मिटला होता. मात्र 27 मार्च रोजी लोकांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे तहसीलदार राहुल गायकवाड, महक स्वामी व अन्य पोलिसांनी खंडाळा गावास भेट देऊन पुन्हा शांतता समितीची बैठक घेतली. 

त्यानंतर उत्सव समितीच्या लोकांनी श्रीराम चौकाचे पोस्टर स्वतःहुन काढले होते. तथापि खंडाळा येथील  एका आरोपीने  एका धर्माविरुद्ध आक्षेपार्ह स्टेटस मोबाईलवर ठेवले. अन्य ४ आरोपींनीही मोबाईलचे व्हिडीओमध्ये लेखी शब्दांनी दृश्य प्रतिरुपणांद्वारे धार्मिक श्रद्धांचा व त्या वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न करुन दोन धर्मांमध्ये जातीय तणाव निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून गुन्हा नोंदवण्यात आला.