“शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर…”; राज्य सरकारवर टीका करत विरोधकांचा सभात्याग

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु झाला. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधक शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईवरून चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांनी कांदा आणि द्राक्षाचे टोपले हातात घेऊन विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या आंदोलन केले. यावेळी त्यांनी ‘खोक्यांची पीडा टळू दे बळीच राज्य येऊ दे’, ‘ईडी पीडा टळू दे, बळीचे राज्य येऊ दे’ अशी घोषणाबाजी केली. तसेच, सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांनी शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा मुद्दा लावून धरला.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी सभेत सांगितले की, “गेल्या ७ दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत, तरीही हे राज्य सरकार यावर तोडगा काढायला तयार नाही. गारपिटीने शेतीचे, फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आडवा झाला असूनही मात्र अद्याप पंचनामे करायला कोणीही गेलेले नाही.” अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, अध्यक्ष महोदयांनी आदेश काढावेत, त्याशिवाय हे सरकार वठणीवर येणार नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारला खडसावले.

महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज कांदा, द्राक्षाचे टोपले घेऊन विधानभवनात प्रवेश केला आणि पायर्‍यांवर ठाण मांडत जोरदार निदर्शने केली.

आंबा, काजूला भाव द्या, कांद्याला भाव द्या, कापसाला भाव मिळालाच पाहिजे… गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा…इडा पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… ईडीची पिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे… अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर जोरदार घोषणाबाजी केली.

राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्याचा शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अशामध्ये विरोधकांनी, “अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा.” असा इशारा दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी विधानसभेतही करण्यात आली. याच मागणीसाठी विरोधकांनी सभात्यागही केला.