आयपीएलच्‍या सामन्यांवर ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या तिघांना अटक

औरंगाबाद ,११ मे /प्रतिनिधी :-आयपीएलच्‍या लखनौ  जायंटस् विरुध्‍द गुजरात टाईटन्‍स सामन्यांवर  ऑनलाईन सट्टा खेळणाऱ्या  तिघांना गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने छापा मारुन अटक केली. ही कारवाई मंगळवार  रात्री चिकलठाणा येथील लक्ष्‍मीनगरातील एका गोडावूनवर करण्‍यात आली. आरोपींकडून नऊ मोबाइल, दोन रजिस्‍टर, कार, नऊ हजारांची रोख असा सुमारे चार लाख १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला.

शुभम संजय पांडे (२३, रा. ब्राम्हण गल्ली बेगमपुरा), राजेश विक्रम गावंदे (३६, रा. चुनाभट्टी, खोकडपुरा) आणि राजेश सुधाकर पुंड (५१, रा. बन्‍सीलालनगर रेल्वेस्‍टेशन) अशी आरोपींची नावे असुन त्‍यांना गुरुवार दि.१२ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले.

गुन्‍हे शाखेच्‍या पथकाला गुप्त बातमीदारा मिळाली होती की, चिकलठाणा परीसरातील लक्ष्‍मी नगरात एका गोडावून व कारमध्‍ये शुभम पांडे आयपीएल मधील लखनऊ जायंटस् विरुध्‍द गुजरात टाईटन्‍स मॅचवर सट्टा लावत आहे. त्‍यानुसार, गुन्‍हे शोखेचे सहायक निरीक्षक महांडुळे यांच्‍या पथकाने लक्ष्‍मीनगरातील गोडावून छापा टाकून वरील तिघांना अटक केली. त्‍यांची चौकशी केली असता, मोबाइलवर किंवा rose1010.com या वर क्रिकेटच्‍या लाईव्‍ह मॅचवर सट्टा खेळणार्या लोकांकडुन सट्टा घेतो व त्‍याची नोंद रजिस्‍टरमध्‍ये करतो अशी माहिती आरोपींनी दिली. आरोपींची झडती घेण्‍यात आली असता, आरोपी शुभम पांडे याच्‍या ताब्यातून सट्टा खेळण्‍यासाठी वापरली जाणारी कार (क्रं. एमएच-०२-एव्‍ही-१५११), सहा मोबाइल, वायफाय राऊटर, दोन रजिस्‍टर, आठ हजार ९५० रुपयांची रोख रक्कम तर आरोपी राजेश गावंदे याच्‍या ताब्यातून दोन आणि राजेश पुंड याच्‍या ताब्यातून एक मोबाइल असा सुमारे चार लाख १९ हजार ९५० रुपयांचा ऐवज जप्‍त करण्‍यात आला. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील एस.एल. दास यांनी आरोपींकडून जप्‍त करण्‍यात आलेल्या कार आणि मोबाइल बाबत तपास करायचा आहे. आरोपींकडील मोबाइल व वेबसाईटवर कोणकोण सट्टा खेळतो आहे, अटक आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय, आरोपींना समीकार्ड घेण्‍यासाठी कोणत्‍या व्‍यक्तीने मदत केली याचा तपासबाकी असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.