लोकनेते गोपीनाथराव मुंडे अठरापगड जातींना न्याय देणारे व्यक्तिमत्व – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

नाशिक, १८ मार्च  / प्रतिनिधी :-   लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी अठरापगड जातीसाठी काम केले. आपल्या कामामुळे ते लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नांदूरशिंगोटे, ता. सिन्नर, येथे लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण  मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रीतम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे,  आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर,  विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदी उपस्थित होते.

अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासन भरपाई देणार – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, हे सरकार शेतकरी, सर्वसामान्यांचे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांवर चालणारे आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई शासन देणार, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला.

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्य नागरिकांना नजरेसमोर ठेवून योजना आखल्या आहेत. गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेंतर्गत भरघोस तरतूद केली आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी प्रमुख शहरांमध्ये वसतिगृह उभारण्यात येतील. ऊसतोड कामगार महामंडळास निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन देऊन स्व.गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले.

गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊ- नितीन गडकरी

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते. समाजातील तळागाळातील नागरिकांसाठी ते योद्धे होते. उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी आपले आयुष्यपणास लावले. कृष्णा खोरे, तापी पाटबंधारे, विदर्भ सिंचनाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम केले. मानवता, एकता आणि समतेच्या आधारावर सर्व समाजाचा विकास होण्यासाठी गोपीनाथराव मुंडे प्रयत्नशील होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत असताना शेतक-यांच्या मुलांसाठी विविध योजना राबवाव्या लागतील. शेतकरी अन्नदाताबरोबरच ऊर्जा दाता बनला पाहिजे. स्मार्ट सिटी बरोबरच स्मार्ट व्हीलेज ही संकल्पना अंमलात आणणे गरजेचे आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री. गडकरी यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती- राधाकृष्ण विखे पाटील

महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंच्या स्मरणार्थ अहमदनगर जिल्ह्यात गोपीनाथ गडाची निर्मिती करण्यात येईल. राजकारण व काम एकत्र न आणता काम करणारे स्व. गोपीनाथराव मुंडे सर्वपक्षात लोकप्रियतेत आघाडीवर होते, असे माजी मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले. माजी मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, की बहुजनांना एकत्र आणण्याचे काम गोपीनाथराव मुंडे यांनी केले. ओबीसींची गणना झाली पाहिजे, मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी ते नेहमीच आग्रही राहिले.

मुलांसाठी वसतीगृह उभारावे : पंकजा मुंडे

माजी मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, भगवान बाबांची भक्ती, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आचरणात आणणारे, गोरगरीब जनतेसाठी झटणारे गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभे राहत आहेत याचा अभिमान आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतिगृह, औरंगाबाद येथे दवाखाना उभारावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  उदय सांगळे यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार श्री. वाजे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास राज्यभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री दादा भुसे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदि मान्यवर उपस्थित होते.

पाऊस आशीर्वाद देऊन गेला : मुख्यमंत्री

आज कार्यक्रम सुरु असताना पाऊस आला. सर्वत्र अवकाळी पाऊस कोसळत आहे. पण शेतकरी बांधवानो काळजी करू नका, आम्ही सोबत आहोत. राज्यातील अनेक भागात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी सर्व ठिकाणी वसतिगृह तयार होतील. तुम्ही सांगितले की मुंडे यांच्या नावाने हॉस्पिटल उभे करायला हवे, पण मुंडे यांच्या नावाने स्मारक पण होईल आणि रुग्णालये सुद्धा होतील.