सिन्नरमध्ये धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला:शाळकरी मुलाला केले जखमी

सिन्नर (जि. नाशिक) : तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलेला असून यामध्ये बिबट्याने पाळीव जनावरांसह मनुष्यांवरही हल्ला करण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमठाणे परिसरात झाडांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने धावत्या दुचाकीवर हल्ला करून मागे बसलेल्या शाळकरी मुलाला जखमी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे.

सोमठाणे येथून जाणाऱ्या पंचाळे रोडने संदीप नारायन धोक्रट हे सायंकाळच्या सुमारास आपल्या अकरा वर्षीय मुलाला घेऊन घरी निघाले होते. यावेळी रस्त्याच्या कडेच्या झुडपात दबा धरुन बसलेल्या बिबटट्याने अचानक त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता बिबट्याला बघताच धोक्रट यांनी दुचाकीचा वेग वाढवत बिबट्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्याने मागे बसलेल्या धोक्रट यांच्या मुलावर हल्ला केला.

मुलाच्या पाठीवर व हाताला बिबट्याचे पंजे लागल्याने तो जखमी झाला. धोक्रट यांनी तेथून पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले. त्यांनी तात्काळ मुलाला दवाखान्यात नेत उपचार घेतले. धावत्या दुचाकीवर हल्ला झाल्याने या रस्त्याने प्रवास करणाऱ्या वाहनधारकांमध्ये घबराट पसरली आहेत. या ठिकाणापासूनच काही अंतरावर शाळा देखील असून या रस्त्याने मुले पायीही ये-जा करत असतात. परिसरात बिबट्यासह बछड्यांचेही वास्तव्य असल्याने काही शेतकऱ्यांनी बघितले आहे. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.