पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दुसरा नेता भारतात नाही-अजित पवार

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाशकात जल्लोषात स्वागत

नाशिक : सत्ताधा-यांवर ताशेरे ओढणारे अजित पवार  उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सत्तेत सामील झाल्याने अनेक समीकरणे बदलली आहेत. त्यातच आज अजित पवार यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या  नेतृत्वाची भरभरुन स्तुती केली. नाशिक  येथे आज शासन आपल्या दारी  कार्यक्रम होत आहे. यासाठी सकाळीच नाशिकमध्ये दाखल झालेल्या अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दुसरा नेता भारतात नाही, असं महत्त्वपूर्ण विधान त्यांनी केलं.

सुरुवातीला त्यांनी राज्यात पावसाचे अत्यल्प प्रमाण असल्याचे सांगत पेरण्या नगण्य झाल्या असून काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे, असे सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही तिघे आढावा घेत असल्याचे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. राज्याचा विकासासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो असून आम्ही परिवार म्हणून काम करत आहोत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून राज्यातील प्रश्न सोडविता येणार आहेत.

पंतप्रधानांच्या वंदे भारतचे लोकांकडून कौतुक

वंदे भारत एक्सप्रेसने  येत असताना अनेक लोकांशी चर्चा केली. त्यानुसार रेल्वेत अनेक लोक साई दर्शनासाठी जात होते. त्यांनी सांगितलं की, वंदे भारत रेल्वेची सर्व्हिस चांगली आहे. अशा सुविधा लोकांना दिल्या पाहिजे, लोकांच्या मूलभूत गरजा लोकांपर्यंत पोहचविल्या पाहिजे.

नरेंद्र मोदी यांचा नऊ वर्षांपासून करिष्मा

गेल्या नऊ वर्षांपासून देशात पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. अनेक कामे होत आहेत, अनेक प्रकल्प राज्यात आले आहेत. नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आहे, तो नाकारता येणार नाही. जगभरात नरेंद्र मोदींचा करिष्मा असून नरेंद्र मोदींसारखं दुसरं नेतृत्व नसल्याचे सांगत केंद्र सरकारकडून अधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.

एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार

भारतीय जनता पक्षासोबत असलेल्या समविचारी पक्षांची बैठक दिल्लीत होणार आहे. या बैठकीला मी आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली. या बैठकीदरम्यान आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गाडीचे खासदार समीर भुजबळ यांनी केले सारथ्य

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे आज नाशिक रोड रेल्वे स्थानकात आगमन होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने ढोलताशा वाजवत, फटाक्यांची आतषबाजी व पुष्पवृष्टी करत नाशिक शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीप बनकर, नितीन पवार, आमदार सरोज आहिरे, माजी आमदार जयवंतराव जाधव, अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष ॲड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, कैलास मुदलीयार, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, विद्यार्थी अध्यक्ष गौरव गोवर्धने, मीनाक्षी काकळीज, सुरेखा निमसे, डॉ.कल्पना शिंदे, संजय खैरनार यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नाशिक दौऱ्यावर आहेत. सकाळी ९ वाजताच्या वंदे भारत एक्सप्रेसने नाशिकरोड रेल्वे स्थानकात त्यांचे आगमन झाले. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर नाशिकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

त्यानंतर नाशिकरोड येथून मोटारसायकल रॅली काढत नाशिक रोड ये शासकीय विश्रामगृहापर्यंत त्यांचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी खासदार समीर भुजबळ यांनी त्यांच्या गाडीचे सारथ्य केले.

नाशिक शहरात त्यांचे नाशिक रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, दत्त मंदिर, उपनगर, द्वारका, मुंबईनाका चौकासह ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करत फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत क्रेनच्या सहायाने हार घालण्यात आला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांची व नाशिककरांची अभूतपूर्व गर्दी बघावयास मिळाली.