मोदी सरकारच्या विरोधात विरोधक एकवटणार,सोनिया गांधी 20 रोजी घेणार समविचारी पक्षांची बैठक

नवी दिल्ली, १२ऑगस्ट /प्रतिनिधी :-
काँग्रेसची विचारधारा आणि संपुआतील घटक पक्ष तसेच समविचारी पक्षांचे नेते आणि काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी 20 ऑगस्ट रोजी बैठक घेणार आहेत. या बैठकीत काँग्रेसप्रणीत राज्य सरकारचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सत्ताधारी मोदी सरकार विरोधात प्रथमच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक एकत्र येत आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजूट कायम राखत भाजपाला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाने रणनीती आखली आहे. येत्या 20 ऑगस्ट रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समविचारी विरोधी पक्षांचे नेते, भाजपा विरोधी पक्षांचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेतेसुद्धा बैठकीत हजर असणार आहेत.
 
 
विरोधकांच्या गदारोळात यंदाच्या पावसाळी अधिवेशनात कामकाज होऊ शकले नाही. यावेळी काँग्रेसला इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची साथ मिळाली. विरोधी पक्षांची ही एकजूट कायम ठेवत आता काँग्रेस मोदी सरकारला घेरण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.