सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ट्रोल करण्यास सत्ताधारी पक्षाचा पाठिंबा असल्याचा आरोप

महाराष्ट्रातील विरोधी पक्ष खासदारांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंना पत्र

नवी दिल्ली, १८ मार्च/प्रतिनिधीः- सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना ऑनलाईन ट्रोलिंग करण्यात गुंतलेल्यांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेसचे खासदार विवेक के. तनखा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना लिहिले आहे.

या पत्राला इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेले नवे सरकार आणि त्यात राज्यपालांची भूमिका यामुळे निर्माण झालेल्या महत्वाच्या घटनात्मक प्रश्नाची सध्या सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी सुरू आहे, असे या पत्रात म्हटले आहे. नव्या सरकारच्या स्थापनेचा विषय हा न्यायप्रविष्ट असला तरी ट्रोल करणारे लोक हे महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाबद्दल सहानुभुती असणारे आहेत. याच लोकांनी चंद्रचूड यांच्याविरोधात वातावरण तयार केले आहे, असेही त्यात म्हटले आहे. ट्रोलिंगमधील शब्द आणि आशय हा अतिशय घाणेरडा असून समाजमाध्यमांवर लाखो लोक त्याला वाचतात. विषय न्यायप्रविष्ट असताना वापरण्यात आलेली घाणेरडी भाषा ही सत्ताधारी लोकांकडून पाठिंबा असल्यानंतरच शक्य आहे, असेही त्यात म्हटले. भारतीय न्यायपालिकेची प्रतिष्ठा सुरक्षित राखण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन पत्रात राष्ट्रपती आणि घटनात्मक व्यवस्थेला करण्यात आले आहे. होत असलेल्या ट्रोलिंगमुळे न्यायपालिकेत हस्तक्षेपही होत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

ट्रोलिंग करणाऱ्यांवरच नव्हे तर त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर व हे सगळे आयोजित करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई केली जावी, असे तनखा यांनी पत्रात आवाहन केले आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी महाराष्ट्रतील राजकीय विषयावरील निवाडा गुरुवारी राखून ठेवला आहे. राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले व त्यामुळे त्यांचे सरकार कोसळले. चंद्रचूड यांनी सुनावणीत कोश्यारी यांनी वापरलेल्या अधिकारांबद्दल प्रश्न उपस्थित केला होता.