अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न; डिझायनरविरोधात गुन्हा दाखल करत केली अटक

मुंबई,१६ मार्च  /प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने लाच देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी डिझायनर अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस यासंबंधित तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अनिष्काच्या वडिलांविरोधात एका गुन्ह्याची नोंद आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी दोघांनीही त्यांना १ कोटी रुपयांची लाच देऊ करण्याचा प्रयत्न होता.

मलबार हिल पोलीस ठाण्यात २० फेब्रुवारीला यासंदर्भात गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, अनिक्षाला उल्हासनगर येथील घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.डिझायनर अनिक्षा ही अमृता फडणवीस यांना गेल्या दीड वर्षांपासून ओळखत आहे. तिने एकदिवस अमृता फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली होती. यावरली आपल्या वडिलांना एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत १ कोटी रुपयांची लाच त्यांना देऊ केली होती. दाखल केलेल्या एफआयआरमध्ये अमृता फडणवीसांनी सांगितले आहे की, १८, १९ फेब्रुवारीला अनिक्षाने तिच्या काही व्हिडीओ क्लिप, व्हॉईस नोट्स आणि अनेक संदेश एका अज्ञात फोन नंबरवरुन अमृता फडणवीसांना पाठवले. यामध्ये ती महिला अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीसांना धमकी देत होती. मुंबई पोलिसांनी अनिक्षा आणि तिच्या वडिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १२० (बी) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८च्या कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात पोलिसांना तपास आणि चौकशी करत आहेत.