अहो, शेतकरी हीच आमची जात आहे…जात विचारून शेतकऱ्यांना खते काय देताय? – अजितदादा पवार

खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,१० मार्च  /प्रतिनिधी :-अहो, शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय? असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला सभागृहात विचारला.

सांगलीत रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली जात असल्याचा मुद्दा अजितदादा पवार यांनी उपस्थित केला व जातिवाद निर्माण करणार्‍या सरकारला खडेबोल सुनावले. रासायनिक खते खरेदी करताना शेतकऱ्यांना जात का सांगावी लागत आहे. ती का नोंदवावी लागते आहे, असा सवाल त्यांनी केला.

ई पॉस सॉफ्टवेअर मशीनमध्ये जातीचा रकाना टाकण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना जात सांगावी लागत असून जातीचे लेबल लावण्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्रात घडता कामा नये, असेही अजितदादांनी सरकारला ठणकावून सांगितले.

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारून सरकारने वर्णभेदाची भूमिका घेतली – जयंतराव पाटील

शेतकरी वर्गात वेगवेगळ्या जातीधर्माचे लोक असतात. त्यांना जात विचारून खत देणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. सरकारने वर्णभेदाची किती आग्रही भूमिका घेतली आहे हे या भूमिकेतून निष्पन्न होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतराव पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. शेतकऱ्याला जात विचारण्याचे कुठलेही कारण नाही. त्यामुळे या गोष्टीचा करू तेवढा निषेध कमी आहे. सरकारने ही भूमिका रद्द करावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितपणे विधानसभेत आपली भूमिका मांडेल, असे ते म्हणाले.

जातीचा, खताचा आणि शेतीचा कोणताही संबंध नसताना शेतकऱ्यांच्या जातिनिहाय संख्येचा आढावा घेऊन राजकारणातील पुढील पावले टाकण्याचे सत्ताधाऱ्यांचे धोरण असावे, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

अतिशय निंदनीय व अशोभनीय

शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी जात विचारली जाते. पुरोगामी महाराष्ट्रात हे योग्य नाही. जात,धर्म, वर्ण, वर्ग, पंथ यापलीकडे जाऊन महाराष्ट्र झेप घेतोय. अशा महाराष्ट्रात जनतेचे, सर्वसामान्यांचे राज्य आले असे मुख्यमंत्री सांगतात आणि त्याच राज्यात शेतकऱ्यांना जात विचारणं अतिशय निंदनीय व अशोभनीय आहे, अशी टीका आमदार सुनिल भुसारा यांनी राज्य सरकारवर केली. तसेच या घटनेत जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

खत खरेदीवेळी जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

खत खरेदी करताना पीओएस मशीनमधील जातीचा उल्लेख वगळण्याबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोलत होते.

सांगली जिल्ह्यात शेतकरी रासायनिक खत खरेदी करत असताना ऑनलाईन माहिती भरली जात आहे. यामध्ये जातीचा उल्लेख आहे हे डीबीटी पोर्टल केंद्र शासनाचे असून जातीचा  उल्लेख  वगळण्याबाबत केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.