वैजापूर – गंगापूर महामार्गावरील इनामी जमिनीची विक्री ; संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करा – वक्फ बोर्डाचे पोलिसांना पत्र

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गावरील जामा मस्जिद व दर्ग्याची इनामी जमीन बेकायदेशीररित्या भाडेपट्ट्याच्याआधारे 99 वर्षांच्या करारावर परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत संबंधितांविरुध्द गुन्हे दाखल करण्याचे आदेश छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाच्या कार्यालयाने दिले आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गावरील शहरालगत असलेली सर्व्हे क्र. 50 व 166 मधील जमीन ही इनामी जमीन असून शहरातील जामा मस्जिदच्या ताब्यात आहे. ही जमीन शहरालगतच असल्याने काही भूमाफियांनी गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर डोळा ठेऊन ती गिळंकृत करण्याचा घाट घातला होता. राज्य महामार्गावरील या जमिनीचा भाव कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्यामुळे ही जमीन हडप करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे ही जागा हडप करण्यासाठी भूमाफियांच्या टोळ्यांमध्ये शीतयुद्ध पेटले होते.  या जमिनीचा वाद यापूर्वीही अनेकवेळा पोलिस ठाण्यापर्यंत पोहचला आहे.

दरम्यान 21 डिसेबर 2022 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ मंडळाच्या कार्यालयाने या जागेवर अनधिकृतपणे बस्तान मांडणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावून ज्यांनी या जागेवर अतिक्रमण केले होते.त्यांची वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर सर्व्हे क्रमांक 50 व 166 मधील मंडळाची जमीन बेकायदेशीररित्या भाडेपट्ट्याआधारे 99 वर्षांच्या करारावर खरेदी – विक्रीचा व्यवहार करण्यात आल्याचे समोर आले.  सहा जणांनी सर्व्हे क्रमांक 50 मधील 09.17 हेक्टर आर व सर्व्हे क्रमांक 166/ 4/3  मधील  एकूण 5.41 हेक्टर आर जमीन दोघांना भाडेपट्ट्याच्याआधारे 99 वर्षांच्या करारावर विक्री केली. याबाबत वक्फ मंडळाच्यावतीने संबधितांना नोटीस बजावण्यात येऊन स्पष्टीकरण मागितले होते. परंतु त्यांनी या नोटीसीला उत्तर दिले नाही. वास्तविक पाहता वक्फ मंडळाच्या मिळकतीची परस्पर हस्तांतरण करणे अथवा विक्री करणारा हा दोन वर्षांच्या शिक्षेस पात्र ठरतो. दरम्यान वक्फ मंडळाच्या जमीनीची परस्पर विक्री करणाऱ्या संबितांविरुध्द कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा. असे लेखी पत्र संभाजीनगर येथील वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांनी वैजापूर पोलिस ठाणेप्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे संबितांविरुध्द किती दिवसात व काय कारवाई होते. हे मात्र येत्या काही दिवसांत समजणार आहे.