व्हीप फक्त उपस्थितीसाठी; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण

मुंबई :-राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईमध्ये सुरू झाले  आहे. या अधिवेशनात एकूण १३ विधेयके मांडली जाणार असून विधान परिषदेत प्रलंबित असलेली ३ विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोपांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. तर, दुसरीकडे शिवसेनेने व्हीप बजावल्याचे माहिती मुख्य प्रतोद भरत गोगावले दिली होती. यावर आता मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण देताना हा व्हीप फक्त उपस्थितीची आहे, २ आठवडे कोणतीही कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट केले.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाने २ आठवडे कारवाई न करण्याचे आदेश दिली आहेत. त्यामुळे हा व्हिप काढून कारवाईचा काही प्रश्नच येत नाही. परंतु, शिवसेनेचे सगळे आमदार आहेत, त्यांनी संपूर्ण अधिवेशनाला उपस्थित राहावे यासाठी हा व्हीप मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी काढला आहे. न्यायालयाच्या निर्देशाचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. उगाच व्हिपच्या मुद्द्याचा बाऊ करण्यात अर्थ नाही.” दरम्यान, शिवसेनेच्या सर्व ५५ आमदारांना रविवारी व्हीप बजावण्यात आला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उपस्थित राहण्यासंदर्भातला हा व्हीप आहे, अशी माहिती शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी दिली. वर्षा निवासस्थानी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० आमदारांना मार्गदर्शन केले. “अधिवेशनाला उपस्थित रहावे, यासाठी हा व्हीप असून कोणी त्याचा भंग केला तरी त्या आमदारा विरोधात कारवाई केली जाणार नाही,” असे गोगावले यांनी स्पष्ट केले.