महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला, त्यावर गुढीपाडव्याला बोलणार:राज ठाकरे 

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडत आहेत. सध्या कुठला आमदार कुठल्या पक्षात आहे हेच कळत नाही. पूर्वी सगळ्या गोष्टी आमने-सामने व्हायच्या. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच या साऱ्या राजकीय परिस्थितीवर २२ मार्चला गुढीपाडव्याच्या सभेत सिनेमा दाखवणार आहे, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या सभेत ते काय बोलणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील गटाला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडींबाबत आज एका मुलाखतीमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी महाराष्ट्रात सध्या हे जे काही चालू आहे त्यावर मी २२ तारखेला शिवतीर्थावर गुढीपाडव्यादिवशी सविस्तर बोलणार असल्याचे सांगितले.

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज पनवेलमध्ये आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी विविध मुद्द्यांसोबत राज ठाकरेंनी शिवसेनेतील फूट आणि महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीबाबत संक्षिप्त भाष्य केले. यावेळी मनसेचा एकच आमदार आहे. त्याने पक्ष आणि चिन्हावर दावा केला, तर काय निवडणूक आयोग काय करणार, या अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, राज ठाकरे म्हणाले की, काय आहे ना की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडलंय. शिवसेनेचं नावं, पक्षचिन्ह गेलं, हे दुर्दैवी झालं की चांगल्या माणसांच्या हातात शिवसेना गेली, काय वाटतं? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले की, टिझर ट्रेलर नाही २२ तारखेला सिनेमाच दाखवणार, मी आता या विषयावर बोलणार नाही,’’असे राज ठाकरे म्हणाले.

परवा मी बाळासाहेबांच्या फोटोच्या अनावरणासाठी विधिमंडळामध्ये गेलो. तिथे सगळे आमदार समोर बसले होते. त्यातील कोण कुठल्या पक्षातील आहे हेच कळत नव्हतं. एखाद्या आमदाराने ओळख करून दिली तर तू कुठल्या पक्षातला, असं विचारावं लागतं. मला राजू पाटीलला ही विचारून पाहायचे आहे. पक्ष घेता का म्हणून? दिवसरात्र आम्ही बरनॉल लावत असतो. आमचे जे जळते आहे, ते तुम्हाला कळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज ठाकरे म्हणाले की, सध्या वर्तमानपत्र मी वाचत नाही. चॅनल, वर्तमानपत्रे जाहिरातीवर चालतात. वर्तमापत्र काढण्याचे आता बघू पुढे. मराठी नियतकालिके बंद पडत असल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली. मराठी माणसांनी मोठ्या प्रमाणात वाचन वाढवले पाहिजे. वर्तमानपत्रे, मासिक, साप्ताहिके जगवली पाहिजे. त्या लोकांनीही तसा खुराक दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या सगळ्या गोष्टी मोबाइलवर मिळत आहेत. मी खरेच सांगतो. मी खूप वाचतो-बिचतो नाही. मात्र, वाचले पाहिजे. नाही तर विचारांना तोकडेपणा येतो. मुलांशी बोलताना त्यांना आपल्या आई-वडिलांकडे विचारांचा तोकडेपणा आहे, असे कळले की ते बाहेर शोधतात, असे निरीक्षणही राज ठाकरे यांनी नोंदवले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, तुमची मुळात ओळख काय? मी कोणय? तुम्ही कोण आहात? तर तुम्ही मराठी आहात. मराठी म्हणजे कोण? तर मराठी भाषा बोलणारा व्यक्ती आहे. भाषा तुमची ओळख असते. त्यामुळे तुम्ही जगात ओळखले जाता. मी फ्रान्समध्ये राहतो. त्याला अर्थ नाही. मला फ्रेंच बोलता आले पाहिजे, असे उदाहरणही त्यांनी दिले.

———————————-

“मी चेहरे वाचतो”

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीचा विषय, ‘ठाकरे काय वाचतात?’ असा होता. यावेळी सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट एका शब्दात उत्तर दिले की, “मी चेहरे वाचतो,” आणि उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला आणि टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. ते म्हणाले की, “रोज मला इतकी माणसे भेटायला येतात, की मी त्यांचे चेहरे वाचतो. मी माणसं वाचतो, म्हणजेच कोण बरोबर राहणार आणि कोण जाणार? हे बरोबर कळते,”, अशी मिश्किल टिपणी यावेळी त्यांनी केली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, “मला वाचनाची आवड ही व्यंगचित्रामुळेच झाली. सध्या चांगले लिहिणारे, विषय समजून सांगणारे लेखक गिरीश कुबेर आहेत. त्यांची पुस्तके मी वाचतो, त्यांचे आंतरराष्ट्रीय घडामोडींवरचे लेखन उत्तम असते. तसेच, अनिता पाध्ये यांचे ‘एकटा जीव’ हे अभिनेते दादा कोंडकेंचे आत्मचरित्र, मला खूप आवडते. ते पुस्तक वाचायला कुठूनपण सुरुवात करा, तरी तेवढीच मजा येते. म्हणून मी ते पुस्तक नेहमी वाचतो.”

राज ठाकरेंना विचारण्यात आले की, “तुम्ही एवढं वाचन करता तरीही विरोधक म्हणतात की, ‘राज ठाकरेंनी थोडं वाचन वाढवावे’ असे म्हणतात तेव्हा काय वाटत?” यावर ते म्हणाले की, “हा त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे. मला फरक पडत नाही,” असे म्हणत त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले. यावेळी त्यांनी राजकीय मुद्द्यांवर बोलणे टाळले. गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन, असे ते म्हणाले.

मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा

२७ फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी राजभाषा दिनाच्या लोकांना शुभेच्छा देत लोकांना पत्र लिहिले आहे. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवे. हे स्वप्न वास्तवात यावे, अशा शुभेच्छा राज यांनी पत्रातून दिल्या आहेत.

मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचे जतन यासाठी नेहमी राज ठाकरे अग्रेसर होते. मराठी भाषेला जपण्याची सुरवात ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मराठी भाषेबद्लचा त्यांचा लढा आता राज ठाकरे पुढे नेत आहे.

राज ठाकरे यांनी वेळोवेळी मराठी भाषेविषयी त्यांच्या मनात असलेले प्रेम दाखवून दिले. एवढंच काय तर प्रत्येक मराठी माणसाला मराठी आली पाहिजे, असा अट्टहास त्यांनी धरला. मराठी भाषा जपण्यासाठी, मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले.

व्यवहारात मराठी, प्रशासनात मराठी, दूरसंचार माध्यमांमध्ये मराठी, दूरदर्शनच्या समालोचनात मराठी असायलाच हवी, असं त्यांचं ठाम मत होतं त्यासाठी त्यांनी अनेकदा ठोस पावले उचलली. मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न आहे, असे राज ठाकरे नेहमी बोलतात.

सर्व दुकानं, आस्थापने आणि कार्यालयांवरील नामफलक अर्थात पाट्या या मराठीत असाव्यात, असा त्यांचा नेहमी आग्रह होता व आहे. मराठी भाषा, मराठी भाषेची अस्मिता जपली पाहिजे आणि मराठी माणूस आणि मराठी माणसाला त्याचे सर्व हक्क मिळायला पाहिजे, यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात.

राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र वाचा जसेच्या तसे…

सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा

कुसुमाग्रजांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाला अभिवादन म्हणून तेव्हांच्या सरकारने कुसुमाग्रज जयंती २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केला. पण नेहमीप्रमाणे सरकारी उदासीनतेत तो साजरा व्हायचा. कुठल्याही राजकीय पक्षाला देखील तो साजरा करायची इच्छा नव्हती. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तो सार्वजनिक स्वरुपात अत्यंत उत्साहात साजरा करायला सुरुवात केली.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पत्रव्यवहार करणारा पहिला पक्ष पण आमचाच. हे सगळे सांगायचा उद्देश इतकाच की, आपल्या भाषेसाठी, आपल्या सणांसाठी, आपल्या संस्कृतीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून इतर एकही पक्ष हिरारीने पुढे आलेला नाही आणि सध्या जी एकूणच राजकीय दंगल सुरू आहे त्यात कुणी येईल अशी शक्यता वाटत नाही.

असो, त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्या लाडक्या मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त शुभेच्छा देताना या भाषेसाठी आपल्याला सगळ्यांना उभे राहावं लागणार आहे. हे भान सोडून चालणार नाही. व्यवहारात मराठी असावी. प्रशासनात मराठी असावी इथपासून ते अगदी दूरसंचार माध्यमांमध्ये. दूरदर्शनवरील समालोचनात, अभिजात भाषेच्या दर्जासाठीही आम्ही संघर्ष केला आणि पुढे देखील करू. पण त्यासाठी आमच्या संघर्षाला तुमची साथ हवी तरच हे शक्य आहे. मला माहिती आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनच तुमच्या सगळ्या बाबतीत अपेक्षा असतात पण या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या साथीचीही नितांत गरज आहे. आपण मराठी एकत्र असू तर सर्वत्र मराठी करायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.

मी माझ्या विकास आराखड्यात म्हणले आहे तसं मराठी जगाची ज्ञानभाषा व्हावी आणि जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडावा हे आपले स्वप्न असायला हवं हे स्वप्न वास्तवात यावं ह्याच आजच्या दिवसाच्या शुभेच्छा..!

आपले नम्र
राज ठाकरे