कोरोनामुळे निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांस धनादेशाचे वितरण

औरंगाबाद,२८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- कोविड-19 मध्ये निधन पावलेल्या कर्तव्यावरील शासकीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 50 लक्ष रुपयाचे सानुग्रह सहाय्य अनुदान शासना तर्फे दिले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून कै.सचीन साळवे यांच्या कुटुंबियाना 50 लक्ष रुपयाच्या धनादेशाचे वितरण आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब शिंदे व कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

                कोविड-19 साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनेत शासकीय कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच/ सानुग्रह सहाय्य  किंवा मदत दिली जाते, यासाठी शासकीय कर्तव्य व सेवा बजावल्याचे प्रमाणपत्र कार्यालयीन आदेश, मृत्यूच्या दिनांकापूर्वी 14 दिवसाच्या काळात कर्तव्यावर हजर असलेले प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे हे 29 मे 2020 च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयाच्या  अटी व शर्तीच्या अधीन राहून ही मदत दिली जाते. कै.सचिन भगवानराव साळवे हे अव्वल कारकुन या पदावर भूसंपादन शाखा (जायकवाडी प्रकल्प) जिल्हाधिकारी कार्यालयात कर्तव्य बजावत होते. त्यांच्या कुटुंबियाच्या अर्जानुसार पत्नी सोनाली साळवे व त्यांची आई यांच्याकडे 50 लक्ष रुपयाचे धनादेश सुपूर्द करण्यात आला.