औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे नाव ‘धाराशिव’

राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी; सामान्य प्रशासन विभागाने अधिसूचना केली जारी

मुंबई ,२४ फेब्रुवारी /प्रतिनिधी :-औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’आणि उस्मानाबाद शहराचे नाव ‘धाराशिव’ करण्याच्या  राज्य शासनाच्या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबाद” या शहराचे नाव बदलून ते “छत्रपती संभाजीनगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक २४ फेब्रुवारी, २०२३ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, ” औरंगाबाद “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते “ छत्रपती संभाजीनगर “, तालुका व जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.

उस्मानाबाद” या शहराचे नाव बदलून ते “धाराशिव” असे करण्याच्या भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र दिनांक 7 फेब्रुवारी, 2023 अन्वये दिलेल्या  महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे, “उस्मानाबाद”, तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य नाव बदलून ते ” धाराशिव ” तालुका व जिल्हा उस्मानाबाद, महाराष्ट्र राज्य असे करण्यात यावे अशी अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाने जारी केली आहे.

            औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने अंतिम मंजुरीसाठी त्याबाबतचे पत्र 20 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्र सरकारकडे पाठविले होते. त्याला आता केंद्राने मंजुरी दिली आहे.

            मागील अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नामकरण ‘ छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचं नामकरण ’धाराशिव’ करण्याची मागणी करण्यात येत होती. संबंधित दोन्ही शहरांचं नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला होता. त्यानंतर राज्य सरकारने हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. आज केंद्र सरकारने दोन्ही शहरांचं नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.  मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळात देखील ठराव संमत झाला होता.

ऐतिहासिक पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलीहे ऐतिहासिक पाऊल आहे. यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे खूप खूप आभार अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. 

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर‘ व उस्मानाबादचे धाराशिव’ ! असे नामकरण करण्याचे स्वप्न पूर्ण झाले असेही मुख्यमंत्री म्हणतात. 

आठ महिन्यांपूर्वी युतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले. त्यानंतर मंत्रिमंडळात दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला होता तसेच यासंदर्भात विधिमंडळातदेखील ठराव संमत झाला होता असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की हे ऐतिहासिक पाऊल असून राज्यातील जनता केंद्र सरकारची आभारी आहे.

‘करुन दाखविले’

‘औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, उस्मानाबादचे ‘धाराशिव’! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!! असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.