प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन उभे करणार – कामगार मंत्री  डॉ. सुरेश खाडे

मिरज येथे १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचा समारोप

सांगली ,२५ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  कामगारांच्या व्यथा, अडचणी, त्यांची सुख:दुख: ही मी स्वत: भोगलेली असून यातून कामगारांच्यासाठी काही तरी मार्ग निघावा यासाठी प्रत्येक जिल्ह्याला कामगार भवन उभे करून एकाच छताखाली कामगारांच्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे १७ व्या कामगार साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर,  ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी,  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, माजी महापौर संगीता खोत यांच्यासह मान्यवर पदाधिकारी, साहित्यिक व कामगार उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, कामगार कष्टाचे काम करत असतो त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या अडचणी निर्माण होतात. कामगारांना योग्य उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक जिल्ह्याला मल्टीपर्पज ईएसआय हॉस्पीटलसाठी प्रयत्न करीत असून ६ ईएसआय हॉस्पीटल मंजूर करण्यात आली आहेत. त्यापैकी पुणे येथील मल्टीपर्पज हॉस्पीटलची पायाभरणी लवकरच करण्यात येईल.  कामगारांची मुले खेळ, उद्योगात आली पाहिजेत यासाठी प्रत्येक जिल्ह्यात त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यासाठी वास्तू उभी करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. ईएसआय हॉस्पीटलला जोडूनच कामगारांच्या मुलांसाठी मेडिकल कॉलेज काढण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. कामगारांच्या मुलांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे सांगून प्रत्येक वर्षी कामगार साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी म्हणाले, कामगार साहित्य चळवळीची अत्यंत आवश्यकता आहे. अनुदवादक फळी निर्माण करून आपल्या भाषेतील साहित्य इतर ठिकाणी पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रम प्रसंगी वैचारिक लेखन, नाट्यलेखन, काव्यलेखन, कथालेखन स्पर्धेतील  विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच विविध लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविकात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी साहित्य संमेलनाबद्दल सविस्तर माहिती देवून हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्वेता हुले यांनी केले. आभार सहायक कल्याण आयुक्त माधवी सुरवे यांनी मानले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.