मराठा समाजातील तरुणांना उद्योजक होण्यासाठी संवाद मेळावा महत्त्वपूर्ण – मंत्री अतुल सावे

औरंगाबाद,१३फेब्रुवारी / प्रतिनिधी :-   मराठा समाजातील होतकरु तरुणांना उद्योगासाठी कर्ज उपलब्ध होण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, तरुणांना उद्योजक होण्यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने चिखलठाणा येथे आयोजित केलेला लाभार्थी आणि बँक यांचा संवाद मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी सांगितले.

या संवाद मेळाव्यास आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार हरिभाऊ बागडे,  महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक महेश डांगे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे किशोर शितोळे, लोकविकास नागरी सहकारी बँकेचे  नामदेव पवार, इन्डसलँड बँकेचे व्यवस्थापक मनोज सदाफले, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचे विभागीय समन्वयक प्रवीण आगवण पाटील, रोजगार व स्वंय रोजगारचे सहायक आयुक्त सुरेश वऱ्हाडे, जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, सेन्ट्रंल बॅक, कॅनरा बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, देना बँक यांच्यासह विविध बँकाचे स्टॉल धारक, विविध मराठा संघटनेचे प्रतिनिधी आणि लाभार्थी उपस्थित होते.

मेळाव्यातून सर्व बँकेचे कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांची यादी तयार करुन युवकांना उपलब्ध करुन द्यावी.  लाभार्थींनी वेळेत कागदपत्रे जमा करावी जेणेकरुन लवकर कर्ज उपल्ब्ध होईल. ही प्रक्रिया सुलभ केल्याने गरजूंना विविध विकास महामंडाळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी सूचना सहकार मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित बँक अधिकारी व प्रतिनिधीना केली. तसेच आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाची १५ लाखावरुन २५लाखापर्यंत कर्जाची मर्यादा वाढविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री. सावे यांनी सांगितले.

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले की, या संवाद मेळाव्यातून महामंडळ प्रत्यक्ष अर्जदार, लाभार्थी बँकाचे प्रतिनिधी आणि अधिकारी, यांच्या समन्वयातून एकत्र ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व यात येणाऱ्या अडचणीवर उपाययोजना करत जास्तीत जास्त तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सहकारी बँकप्रमाणेच राष्ट्रीयकृत बँकेने कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणत करावा. यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. महामंडळाअंतर्गत महिलांना देखील कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.  यासाठी महिला समन्वयकाच्या माध्यमातून महिलांना कर्ज उपलब्ध करुन उद्योजक तयार करण्यासाठी  अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. निर्यातक्षम उत्पादन वाढविण्याबरोबरच कर्जाची मर्यादेत वाढीसाठी महामंडळ प्रयत्नशील असल्याचे पाटील यांनी सांगितले.

आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले की, उद्योजक होण्यासाठी तीव्र इच्छाशक्तीसह निवड केलेल्या व्यवसायाची संपूर्ण माहिती तरुणांनी करुन घ्यावी. बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करुन तरुणांनी व्यवसाय सुरु करावा. बँकाचा विश्वास संपादन करण्यासाठी नियमित कर्ज परतफेड करावी.

किशोर शितोळे यांनी सांगितले की, आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी तरुणांना उद्योजक घडविणे आवश्यक आहे. रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडाळाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. जिल्ह्यात ४७५ लाभार्थींना ३५ कोटींचे कर्ज, देवगिरी नागरी सहाकारी बँकने उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचा व्याजाचा परतावा लाभार्थींनी पूर्णपणे केला आहे.     कार्यक्रमात लाभार्थी उद्योजक यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये सचिन पेरे, सोमनाथ खांडेभराड, राहुल पोटफाडे, दिपाली पाटेकर, विशाल सोळंखे, रामेश्वर पाटोळे, दादासाहेब निकम यांचा प्रातिनिधीक स्वरुपात सन्मान करण्यात आला.