महावितरणाच्या वीज दरवाढ विरोधी हरकती दाखल करा:वीज ग्राहक व औद्योगिक ग्राहक संघटन समिती

दरवाढ प्रस्तावाचे होळी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

औरंगाबाद,१३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  महावितरणाच्या वीज कंपनीतर्फे वीज नियामक आयोगाकडे पुढील दोन वर्षाकरिता  २०२३ – २०२५) रुपये ६७ ६४४/- कोटी दरवाढ मंजूर करण्याच्या प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे, आज रोजी सी.एम.आय.ए. ने मासिआ आणि ऊर्जा मंचच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित केली होती.

२६ जानेवारी रोजी महावितरणाच्या वीज कंपनीतर्फे वीज नियामक  आयोगाकडे पुढील दोन वर्षाकरिता  (२०२३ – २०२५) रुपये ६७६४४/- कोटी दरवाढ मंजूर करण्याच्या प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. स्थिर आकार, तसेच वहन आकार या तीनही प्रकारांमध्ये ही वाढ करण्याची महावितरण कंपनीची मागणी असून ती मान्य झाल्यास सर्वच ग्राहकांना रुपये २.५० /- प्रति युनिट असा मोठा आर्थिक फटका  बसणार आहे. अंदाजे  ३७% दरवाढ  करण्याची महावितरण कंपनीची ही मागणी सर्वच वीज ग्राहकांचे कंबरडे मोडणारी आहे. राज्यात येणाऱ्या नव्या उद्योगांना रोखणारी व कोरोना महामारी नंतर स्थैर्य स्थापन करण्याचा प्रयत्नात असलेल्या  उद्योगजगतावर मोठा आर्थिक बोजा वाढवणारी आहे. 

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २० मार्च २०२० रोजी पुढील पाच वर्षासाठी (१ एप्रिल ते ३१ मार्च २०२५) वीज दर निश्चित केले होते. २०२२- २३ मध्ये आयोगाने सरासरी विक्री दर हा  रु. ७.२७/ युनिट ( ऍव्हरेज   कॉस्ट ऑफ सप्लाय ) ज्यात वीज दर, वहन दर व  प्रशासकीय खर्च ई. बाबींचा समावेश होता. करानो महामारीच्या काळात महावितरण कंपनीने एकूण विजेच्या मागणीच्या १८ टक्के वीज हि अदानी पॉवर या कंपनी कडून रुपये ७. ४३ प्रति युनिट एवढ्या वाढीव दराने खरेदी केली, हि रक्कम देण्यासाठी महावितरण कंपनीने सर्वसाधारण वीज ग्राहकांच्या मासिक वीज बिलात इंधन अधिभार नावाखाली अतिरिक्त रक्कम वसूल करणे सुरु केले, महावितरण कंपनीच्या ह्या अकार्यक्षमतेचा फटका सहन करत असलेल्या वीज ग्राहकांना आता पुन्हा एकदा वीज दरात ३७ टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव महावितरणने आयोगापुढे दाखल केला आहे 

स्वतःची कार्यक्षमता न वाढविता, खर्च वाढला – तोटा वाढला कि करा दरवाढ या महावितरणच्या कार्यशैलीवर आता लगाम लावण्याची गरज आहे, हि दरवाढ मंजूर झाल्यास राज्याच्या विकासावर गंभीर व दूरगामी परिणाम होतील हे लक्षात घेऊन राज्य शासनाने कठोर व ठाम भूमिका घ्यावी, तसेच या दरवाढ प्रस्तावाला सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करावा व आयोगाकडे १५ फेब्रुवारीपर्यंत आपल्या हरकती दाखल कराव्यात तसेच या दरवाढ प्रस्तावाची दिनांक २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या होळी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन वीज ग्राहक व औद्योगिक ग्राहक संघटन समितीतर्फे करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेसाठी सी.एम.आय.ए.चे संयुक्त कोषाध्यक्ष श्री अथर्वेशराज नंदावत, मासिआ चे श्री दुष्यंत आठवले, महाराष्ट्र लघु उद्योग भारती चे अध्यक्ष श्री रवींद्र वैद्य, श्री प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र विज ग्राहक संघटना आणि उर्जा मंच कडून श्री हेमंत कपाडिया उपस्थित होते. सूत्रसंचलन सी.एम.आय.ए. चे श्री.रवींद्र मानवतकर यानी केले.