खरे गद्दार ठाकरेच – रोहयो मंत्री संदिपान भुमरे

वैजापूर ,९ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- 2014 च्या विधानसभा निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व हिंदु ह्रदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो लावुन मते मागितली व निवडणुकीनंतर सत्तेसाठी भाजपला सोडून कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसशी युती करत महाआघाडीची स्थापना केली. मग खरे गद्दार कोण असा सवाल करत ठाकरे हेच खऱ्या अर्थाने गद्दार असून त्यांना आम्हाला बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. असा घणाघात जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांनी केला. 

वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ट कार्यकर्ते भागिनाथ दादा मगर यांनी बुधवारी (ता.08) आपल्या समर्थकांसह तलवाडा (ता. वैजापूर) येथे झालेल्या कार्यक्रमात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. भागिनाथ मगर व त्यांच्या सहकाऱ्यांचे भुमरे यांच्यासह आमदार रमेश पाटील बोरणारे, माजी नगराध्यक्ष साबेर खान, बाजार समितीचे माजी सभापती रामहरी बापु जाधव, संतोष काळवणे, जिल्हा समन्वयक बाळासाहेब चव्हाण, तालुकाध्यक्ष राजेंद्र साळुंके, अनिल चव्हाण, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष साहेबराव औताडे, महिला आघाडीच्या पद्माताई साळुंके, सुप्रिया व्यवहारे, सुलभा भोपळे आदींनी स्वागत केले. या कार्यक्रमात भुमरे बोलत होते.

संदिपान भुमरे म्हणाले, ग्रामपंचायतीचा सरपंच हा एखाद्या आमदारापेक्षाही हुशार असतो कारण त्याला गावातील सर्व खाच खळगे माहीत असतात. त्या अनुषंगाने ही निवडणुक अवघड असते. एक एक सदस्य महत्वाचा असतो. त्याने गट किंवा पक्ष बदलणे फारच अवघड असते. या पार्श्वभूमीवर जेव्हा एखाद्या पक्षातील 50 आमदार व खासदार बाहेर पडतात तेव्हा खरोखर पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पालकमंत्री म्हणुन काम करत असतांना आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले असुन यापुढील काळातही निर्णय घेणार आहे. रोहयोच्या माध्यमातुन पाणंद रस्ते, जनावरांसाठी गोठे आदी कामे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले‌.

यावेळी आमदार रमेश बोरनारे व माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनीही विरोधकांचा समाचार घेतला. साबेर खान म्हणाले, आमदारांनी तालुक्यात तब्बल दोन हजार कोटींची कामे मंजुर केली असून नगरपालिकेला आतापर्यंत साठ कोटींचा निधी विकासकामांसाठी दिला आहे. तेव्हा विरोधकांनी एका स्टेजवर येऊन विकास कामांवर बोलावे असे आवाहन त्यांनी केले. महालगाव येथील आमदार आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या वेळी झालेल्या कथित गोंधळास आमदार कसे जबाबदार असा सवाल करत आमदार बोरणारे व खान यांनी असे खोटे आरोप करणाऱ्यांनी शपथ घ्यावी. असे आवाहन दिले.