पंतप्रधान मोदी आज  दोन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ना दाखविणार हिरवा कंदील

वंदे भारत’मध्ये लहान मुलांसोबत मोदी मारणार गप्पा

मुंबई ,९ फेब्रुवारी  / प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी १० फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते आंतरराज्य प्रवास करणाऱ्या ‘मुंबई ते शिर्डी’ आणि ‘मुंबई ते सोलापूर’ या दोन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ना हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दोन ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ना हिरवा कंदील दाखवतील. त्यानंतर त्या दोन्ही गाड्या पुढील प्रवासाला रवाना होतील. सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे लाईनवरूनच वेगवान आणि आरामदायक प्रवास यासाठी या ट्रेन बनविण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही पहिली सेमीस्पीड ट्रेन आहे. पूर्णपणे एसी, वायफाय, अद्ययावत सस्पेंशन, पूश – बॅक सीट्स अशी या रेल्वेची खासियत असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १०फेब्रुवारीला वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनासाठी आणि मरोळ येथील कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबईत पोलिसांच्या बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. मुंबई पोलीस आधीच सतर्क झाले असून त्यांनी ऑलआऊट ऑपरेशनही केले आहे. तसेच याबाबत वरिष्ठांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठक झाली आहे. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सुरक्षेच्या दृष्टीने सज्ज झाले आहे.

मोदी यांचा मुंबई दौरा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी २.१० मिनिटांनी मुंबई विमानतळावर दाखल होतील. मुंबई विमानतळावरून हेलिकॉप्टरने आयएनएस शिक्रावरती येणार. नंतर दुपारी २.४५ वाजता सीएसएमटी स्थानकावर पोहोचतील. पंतप्रधान मोदी प्लॅटफॉर्म अठरा वर दोन मिनिटांसाठी चालत ‘वंदे भारत’ ट्रेनकडे जाणार आहेत. ‘वंदे भारत’मध्ये लहान मुलांसोबत ते ७ मिनिटे गप्पा मारतील. वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. साधारणता ३ मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. यासंदर्भात १ मिनिटाचे प्रेसेंटेशन मोदींना दिले जाईल. प्लॅटफॉर्म १८ वरून वाहनाच्या दिशेने २ मिनिटात पोहोचतील आणि तिथून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. सीएसएटी रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म नंबर १८ वरती हा साधारणता १५ मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. पुन्हा ३.५५ ला सीएसटी वरून आयएनएस शिक्रावरती दाखल होतील. पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना होतील. दुपारी ४.२० मिनिटांनी मुंबई विमानतळ दाखल होतील. मोदी मुंबई विमानतळ ते मरोळ कारने जाणार आहेत.