अल्पवयीन मुलीवर बलात्‍कार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी 

औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- भावांसह शाळेजवळ खेळण्‍यासाठी गेलेल्या ७ वर्षीय मुलीला सोबत नेत तिच्‍यावर बलात्‍कार करणाऱ्या नराधमाला २० वर्षे सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली ३० हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्‍यायधीश के.आर. चौधरी यांनी ठोठावली. किरण ज्ञानेश्‍वर खंडागळे (१६, रा. ता. खुलताबाद) असे आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणात ७ वर्षीय पीडितेच्‍या आईने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार, २८ जून २०१७ रोजी सांयकाळी सहा वाजेच्‍यासुमारा पीडिता ही आपल्या भावांसह परिसरातील शाळेजवळ खेळण्‍यासाठी गेली होती. त्‍यावेळी आरोपी हा तेथे आला व त्‍याने पीडितेला सोबत घेत तिच्‍यावर बळजबरी बलात्‍कार केला. दरम्यान पीडितेला कोणीतरी उचलून नेल्‍याची बाब पीडितेच्‍या भावांनी घरी जावून फिर्यादीला सांगितली. फिर्यादी पीडितेचा शोध घेत शाळेजवळ आली असता, पीडिता रडत येताना दिसली. फिर्यादीने तिला जवळ घेत चौकशी केली असता घडलेला प्रकार तिने सांगितला. व आरोपी हा शाळेच्‍या मौदानात सायकल खेळत असल्याचे सांगितले. फिर्यादी मैदानाकडे गेली असता आरोपी हा घराकडे निघाला होता, फिर्यादीने त्‍याचा पाठलाग करित त्‍याचे घर गाठले. फिर्यादीने आरोपीला जाब विचारला असता त्‍याने मारहाण करण्‍याची धमकी दिली तर आरोपीच्‍या आईने फिर्यादीशी भांडण केले. या प्रकरणात खुलताबाद पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

या प्रकरणात सहायक पोलिस निरीखक ई.जी. पाटील यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक लोकाभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपीला भादंवी कलम ३७६ अन्‍वये १० वर्षे सक्तमजरी आणि १० हजार रुपये दंडा, पोक्सोच्‍या कलम ३ आणि ४ अन्‍वये २० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.या प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार जाबीर शेख यांनी काम पाहिले.