चालत्‍या रेल्वेत प्रवासींची लूट:तिघा आरोपींना एक वर्षे सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा

औरंगाबाद,१८ जानेवारी / प्रतिनिधी :-चालत्‍या रेल्वेत घुसून चाकूने मारहाण करित दोन प्रवशांना लुटमार केल्यानंतर चेनपुली ओढून रेल्वेतून पळून जाणाऱ्या तिघा आरोपींना एक वर्षे सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.ए. मोताळे यांनी ठोठावली. ही घटना १५ एप्रिल २०२१ रोजी सिंकदराबाद ते रोटेगाव अजंता एक्सप्रेस मध्‍ये मध्‍यरात्री नांदेड रेल्वे स्‍थानकावर घडली होती.शेख उस्मान उर्फ गोरु शेख अलीम (२०) आणि शेख इम्रान उर्फ आदू शेख रशिद (२०) आणि शुभम ऊर्फ शिवा जालींदर दवणे (२२, सर्व रा. नांदेड) अशी आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणात कुणाल दिलीप चव्हाण (२१, रा. स्वामीसमर्थ नगर ता. वैजापूर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानूसार, कुणाल चव्हाण व राम छिन ब्रम्हया (५८, रा. नागतोड नवनाथ नगर ता. चाळीसगाव  जि. जळगाव) हे १५ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अजंता एक्सप्रेसने सिकंदराबाद ते रोटेगाव असा प्रवास करित होते.  मध्यरात्री रेल्वे नांदेड येथे थांबली. रात्री साडेबारा वाजता फिर्यादी बसलेल्या डब्यात तीन जण शिरले. साडेबारा वाजात रेल्वे निघाली असता तीघे आरोपी फिर्यादी व राम ब्रम्हया जवळ आले, त्यांनी अचानक चाकूने मारहाण सुरु केली. आरोपींनी फिर्यादीची बॅग ज्यात पासपोर्ट, एअरक्राफ्ट लॉगबुक, इअरफोन, जुने कपडे, तांब्याची वॉटरबॅग सामान होते ती हिसकावुन घेतली तर ब्रम्हया यांच्याकडील १५०० रोकरक्कम असा सुमारे पाच हजार १०० रुपयांचा ऐवज हिसकावून घेतले. त्यानंतर आरोपींनी रेल्वेची चेन ओढली, रेल्वे थांबताच आरोपींनी तेथुन धूम ठोकली.या प्रकरणात नांदेड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात नांदेड लोहमार्ग ठाण्‍याचे निरीक्षक सुरेश उनवणे यांनी न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्‍या सुनावणीवळी सहायक सरकारी वकील ए.व्‍ही. घुगे यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवले. दोन्ही बाजुंच्या युक्तीवादानंतर साक्ष-पुराव्यांवरुन न्यायालयाने आरोपींना भादंवी कलम ३९४, ३४ अन्‍वये एक वर्षे सहा महिने सक्तमजरी आणि प्रत्‍येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून जमादार आर.एच. राठोड आणि ए.व्‍ही. गेजगे यांनी काम पाहिले.