पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक; आई हिराबेन मोदी  यांचे  १०० व्या वर्षी निधन

अहमदाबाद :-मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री, हिराबेन मोदी यांनी वयाच्या 100 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. खुद्द पंतप्रधानांनीच शुक्रवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्विट करत आपल्या आईच्या निधनाची माहिती दिली. यावेळी त्यांनी हिराबा यांचा एक फोटोही शेअर केला. दरम्यान, मातोश्रींच्या निधनाचं वृत्त समोर येताच पंतप्रधान अहमदाबादच्या दिशेने  रवाना झाले. 

‘शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम…’ असं लिहित आईच्या रुपात आपल्याला दिसलेल्या तपस्वी आणि मूल्यांप्रती जीवन समर्पित करणाऱ्या एका कर्मयोगिणीला त्यांनी श्रद्धासुमने  वाहिली.आईच्या निधनाचं वृत्त कळताच पंचप्रधान भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. हिराबा यांच्या आठवणींमध्ये ते रमले आणि भावनांच्या भरात एक आठवण देशवासियांपुढेही आणली. पंतप्रधान म्हणाले, ‘आईच्या 100 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेव्हा मि त्यांना भेटलो तेव्हा त्या एकच गोष्ट म्हणाल्या होत्या, जी माझ्या कायम लक्षात राहील. ती गोष्ट म्हणजे बुद्धीनं काम करा आणि शुद्धीनं आयुष्य जगा’. थोडक्यात आयुष्यात कायमच बुद्धिचातुर्याचा वापर करा. पण, जीवनातील पावित्र्य गमावू नका असा संदेश हिराबा यांनी लेकाला दिला होता.