अभ्यासू, मार्गदर्शक नेतृत्व हरपले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
Maharashtra: Congress leader Vilaskaka Patil Undalkar Passes Away

मुंबई, दि. 4 : राज्याच्या सहकार, ग्रामविकास या क्षेत्रांसह सामान्यांच्या जीवनाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषयांतील अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी मंत्री ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, स्वातंत्र्यसेनानी कुटुंबांचा वारसा जपत विलासकाका यांनी सुरू केलेली राजकीय वाटचाल समाजकारणाशी जोडलेली होती. राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळून सहकार, ग्रामविकास, जलसंधारण या क्षेत्रात भरीव काम केले. अनेक संस्था आणि सामाजिक उपक्रमांना त्यांनी जाणीवपूर्वक बळ दिले. विविध विषयांतील गाढा अभ्यास आणि परखडपणामुळे ते अनेकांसाठी मार्गदर्शक व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारण-समाजकारणातील दोन पिढ्यांना जोडणारे मार्गदर्शक नेतृत्व हरपले आहे. ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांना विनम्र श्रद्धांजली.

ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्व काळाच्या पडद्याआड – उपमुख्यमंत्री अजित पवार

ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून सहकाराच्या माध्यमातून ग्रामविकासाला वाहून घेतलेलं ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील नेतृत्व आज काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विलासकाकांनी १९८० ते २०१४ अशी सलग ३५ वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेलं कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचं वेगळेपण दाखवणारी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचं योगदान देणारं नेतृत्वं म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपला! – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

राज्याचे ज्येष्ठ नेते व माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनामुळे काँग्रेस विचारधारेचा सच्चा पाईक हरपल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनावर तीव्र दुःख व्यक्त करताना चव्हाण म्हणाले की, त्यांनी आयुष्यभर काँग्रेसचा विचार उराशी बाळगून लोकसेवा केली. अगदी प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली तत्त्व आणि मूल्ये कायम ठेवली. ते सर्वसामान्यांशी नाळ जुळलेले एक लोकप्रिय नेते होते. सलग ३५ वर्षे आमदार म्हणून सातारा जिल्ह्यासाठी आणि सहकारमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. स्व.डॉ. शंकरराव चव्हाण यांचे ते निकटचे सहकारी होते. त्यांच्या निधनाने राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रासह काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाल्याचे चव्हाण यांनी दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहताना म्हटले आहे.

लोकप्रिय, अनुभवी व निष्ठावंत नेतृत्व हरपले – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाने अत्यंत लोकप्रिय, अनुभवी व निष्ठावंत नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना श्री.थोरात म्हणाले की, विलासकाकांनी 1962 मध्ये जिल्हाबँकेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला होता. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी सलग 35 वर्षे प्रतिनिधित्व केलं. राज्याच्या मंत्रीमंडळात सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास अशा अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती.

राजकारणासोबतच सहकार क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. रयत सहकारी साखर कारखान्याची त्यांनी स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील अग्रणी बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ओळख निर्माण केली. अनेक सहकारी संस्थांच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्राची तसेच काँग्रेस पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. विलासकाका पाटील उंडाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उंडाळकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असेही श्री. थोरात म्हणाले.

प्रामाणिक आणि निष्ठावान नेतृत्व हरपले-सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख 

ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या निधनाबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून काँग्रेस पक्षातील प्रामाणिक आणि निष्ठावान नेतृत्व आज हरपले आहे, अशा शब्दात आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

विलासकाका पाटील उंडाळकर यांना श्रद्धांजली वाहताना श्री.देशमुख म्हणाले, सर्वसामान्यांना मदत करण्याचा वृत्तीमुळे ते एक लोकप्रिय नेते होते. त्यांनी १९८० ते २०१४ अशी सलग ३५ वर्षे दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्वं केले. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राज्य मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी केलेलं कार्य सदैव स्मरणात राहील. विलासकाकांनी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेले कार्य, डोंगरी विकास निधीची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी दाखवलेली दूरदृष्टी त्यांचे वेगळेपण दाखवणारी आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान देणारे नेतृत्व म्हणून विलासकाका सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दात श्री.देशमुख यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.