खातेवाटपाचा चेंडू अमित शाहांच्या कोर्टात ;मंत्रीमंडळ विस्ताराचा पेच दिल्ली दरबारात तरी सुटेल का?

मुंबई,१२ जुलै /प्रतिनिधी :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये आपल्या आठ आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, शपथ घेतलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांना अद्यापही खातेवाटप झालं नसल्याने हा तिढा सुटताना दिसत नाही. उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांना अर्थमंत्री पदा देण्यात येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. दुसरीकडे त्यांना अर्थखात देण्यास शिंदे गटासह मित्रपक्षांनी विरोध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा बंडखोर गट मात्र काही खात्यांसाठी आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे. खातेवाटपाचा हा तिढा सुटत नसल्याने आता हा विषय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात पोहचला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बैठका झाल्याय मात्र, राष्ट्रवादीच्या मंत्रिपदाचा तिढा काही सुटायचं नाव घेत नाही. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना शपथ घेऊन ९ ते १० दिवस उलटले असूनही खातेवाटप न झाल्याने राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या आमदारांमध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याममुळे हा खातेवाटपाचा तिढा आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात पोहचला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला रवाना झाले आहेत. प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत दिल्ली रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ खडसे हे देखील दिल्लीला रवाना झाले असल्याचं सांगितलं जात आहे. या तिन्ही नेत्यांची अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेत काय चर्चा होते आणि खातेवाटपावर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.