टीका, मानापमान आणि निलंबन… असा होता हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारचा दिवस

नागपूर ,२२ डिसेंबर/ प्रतिनिधी :-हिवाळी अधिवेशनाचा आजचा दिवस हा वादळी ठरला. एकीकडे सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणावरून अनेकदा सभागृहाचे कामकाज दिवसातून ३ वेळा तहकूब केले, तर दुसरीकडे विरोधकांनी बोलण्याची संधीच दिली जात नसल्याचे आरोप विरोधकांनी केले. एवढचं नव्हे तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर विरोधीपक्षनेते घडल्या प्रकारची माफी मागत सर्व विरोधकांनी सभात्याग केला. मात्र, त्यानंतर विधानभवन परिसरामध्ये महाराष्ट्र सरकारवर टीकादेखील केली.

नेमकं घडलं काय?

हिवाळी अधिवेशनामध्ये आज दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. याप्रकरणी विरोधकांना बोलूच दिले जात नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, ‘असा निर्लज्जपणा करू नका’ अशा भाषेत त्यांच्यावर टीका केली. या विधानामुळे सत्ताधारी नेते आक्रमक झाले आणि जयंत पाटीलांचे निलंबन करा, अशी मागणी त्यांच्याकडून होऊ लागली.काहीकाळ अध्यक्षकांच्या दालनामध्ये बैठक झाल्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रस्ताव मांडला. त्यावर अध्यक्षांनी ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट केले की, “या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार,” जयंत पाटील यांनी केलेल्या कृत्याबद्दल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत माफी मागितली. मात्र, बाहेर येताच त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. एवढंच नव्हे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निलंबनानंतर जयंत पाटीलांना खांद्यावर घेत जल्लोष केला.