जयंत पाटील यांचे निलंबन:विधानसभा अध्यक्षांबाबत असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. जयंत पाटील यांचे एक वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली होती. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटलांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप केला जात आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली.

नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरु आहे. यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले. यावेळी विरोधकांना बोलू दिले जात नाही, असे म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले. त्यावेळी ‘तुम्ही असा निर्लज्जपणा करू नका’ असे जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले.

यावेळी जयंत पाटील यांनी वापरलेला शब्द विधानसभा अध्यक्षांना उद्देशून असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केला. त्यानंतर काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. जयंत पाटील यांचे एका वर्षासाठी निलंबन करण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी केली होती.