नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणी शिंदेचा खोटारडेपणाच पितळ विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केले उघड

२०१८ ला पत्र नगरविकास प्रधानसचिवांना दिल्याचे आणले समोर

नागपूर ,२२ डिसेंबर/ प्रतिनिधी :-नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण मधील भूखंड प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची कल्पना २९ मे २०१८ ला लाचलुचपत विभागाने पत्राद्वारे नगरविकास प्रधान सचिवांना दिली होती, हे सिद्ध करणारे पत्रच आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत समोर आणून त्याची प्रत पत्रकारांच्या हाती दिली. त्यामुळे हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याची कल्पना आपल्याला नव्हती असे दावा करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोटारडेपणा करीत सभागृहाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप दानवेंनी केला.

शिंदे फडणवीस सरकारचा खोटारडेपणा व भ्रष्टाचाराचे पितळ उघडकीस आले असून मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी दानवे यांनी केली.”कोणताही मंत्री अपील घेताना संबंधित बाबींची  नस्ती तपासूनच अपील घेतो. यावरून मुख्यमंत्री यांनी खोटी माहिती देऊन सभागृह व न्यायालय यांचा अपमान केला व दिशाभूल केली आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री म्हणून ते दबाव आणू शकतात, त्यामुळे त्यांनी राजीनामा देणे गरजेचे आहे,” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

    सदर प्रकरण न्याय प्रविष्ट असतानाही तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी हस्तक्षेप केल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले ही गंभीर बाब  असून शिंदे यांच्या भ्रष्टाचारावर उच्च न्यायालयाने ठपका ठेवला असल्याचे दानवे यांनी म्हटले.या प्रकरणात तत्कालीन सभापती दीपक म्हैसेकर, अश्विन मुदगळ, शीतल तेली उगले व मनोजकुमार सूर्यवंशी या चार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे फोन रेकॉर्ड तपासले पाहिजे अशी मागणी दानवे यांनी केली.

या प्रकरणात २ अधिकारी हे आयएस आहेत त्यामुळे त्यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री यांना माहिती दिली नव्हती का याबाबतही चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, असे दानवे यांनी म्हटले.

नागपूर सुधार प्रन्यास हे प्राधिकरण नगर विकास विभागाच्या अधिनस्थ असून मौजे हरपूर येथील साडेचार एकर जमिनीचा ताबा नागपूर सुधार प्रन्यास प्राधिकरण यांच्याकडे होता. यासंदर्भात हरपूरच्या भूखंड क्रमांक ९,१०, ११, १२ व १६/२ याबाबत उच्च न्यायालय नागपूर बेंच येथे रिट पिटीशन क्रमांक २२२७० च्या २००४ ही याचिका न्यायप्रविष्ट होती.

       नागपूर सुधार प्रन्यास सभापती दीपक म्हैसकर यांनी १७९८६ चौरस मीटर या भूखंडाबाबत गुंठेवारीच्या नियमानुसार आदेश पारित केले होते. परंतु सदर एनआयटी चा भूखंड हा गुंठेवारी मध्ये येत नसल्याने  ते आदेश नियमबाह्य करण्यात आले.

   तत्कालीन सभापती यांनी हा भूखंड देण्यासाठी नकार दिलेला असतानाही तत्कालीन नगरविकास मंत्री यांनी दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी अपील घेऊन अंदाजे ८३ कोटी रुपये किंमतीचा हा भूखंड १६ बिल्डरांना २ कोटी रुपयांना भाडेतत्त्वावर देण्यासाठी आदेश दिल्याचे दानवे यांनी सांगितले.