गतिमानपणे मुंबईचा कायापालट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

नागपूर ,२० डिसेंबर/ प्रतिनिधी :-रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पदपथ, रस्ते, उड्डाणपूल यांचे सुशोभीकरण आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण या सर्व कामांमुळे मुंबई बदलत आहे. मुंबईकरांच्या कल्याणासाठी आगामी काळात अशाच गतिमानपणे मुंबईचा कायापालट करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली.

मुंबई मालमत्ताकर विधेयकावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, मुंबईच्या विकासासाठी दिलेला शब्द आम्ही पाळला आहे. मुंबई बदलत असून आता महानगरातील सर्व रस्त्यांचे ६००० कोटी रुपये खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. सोबतच मुंबईच्या सुशोभीकरणालादेखील सुरुवात झाली आहे. त्यामध्ये रस्ते, वाहतूक बेट, पदपथ, उड्डाणपूल यांचे सौंदर्यीकरण केले जात आहे.

मुंबईत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असून प्रत्येक वॉडमध्ये हा दवाखाना सुरू होणार आहे. त्याद्वारे उपचार आणि महत्त्वाच्या वैद्यकीय चाचण्यादेखील मोफत करण्यात येणार आहेत. मुंबईत ५५०० आशा स्वयंसेविकांची सेवा आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहर स्वच्छतेसाठी ५००० स्वच्छतादूतांची नियुक्ती केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जी २० परिषद बैठकीसाठी मुंबई सजली होती. त्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक जी २० परिषदेचे शेर्पा अमिताभ कांत यांनीदेखील केले. विविध विकास कामांच्या माध्यमातून मुंबई बदलत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.