राज्याचा आम्हाला लवासा करायचा नाही; विरोधकांच्या टीकेवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

नागपुरातील हिवाळी अधिवेशाआधी शिंदे-फडणवीस सरकारने पत्रकार परिषद घेत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले

नागपूर ,१८ डिसेंबर/ प्रतिनिधी :-नागपूरमध्ये १९ तारखेपासून हिवाळी अधिवेशाची सुरुवात होणार आहे. याआधीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चहापानाचे आमंत्रण विरोधकांना दिले होते. मात्र, त्यांनी बहिष्कार टाकत राज्य सरकारवर टीका केल्या होत्या. या टीकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. ते म्हणाले, ” आधी मी नागपूरमध्ये एक कार्यकर्ता म्हणून यायचो, त्यानंतर एका मंत्री म्हणून आलो. तर आता मला मुख्यमंत्री म्हणून यायची संधी मिळाली. विदर्भ आणि नागपूरचे माझे जिव्हाळ्याचे संबध आहेत. हे अधिवेशन महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचे आहे. यापूर्वीच्या सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत नागपूरमध्ये अधिवेशन घेण्याचे टाळले होते. आता तेच तीन आठवडे अधिवेशन घेण्याची मागणी करतात.”

पुढे ते म्हणाले की, “विरोधीपक्षनेते अजित पवार हे खोक्याची भाषा करतात. त्यांच्या तोंडून खोक्याची भाषा शोभत नाही. तुमच्या खोक्यांचे थर लावले तर शिखर इतके उंच होईल. आम्हाला राज्याचा लवासा कार्याचा नाही.” असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यायला हवा. त्यावरून कोणीही राजकारण करू नये. आमचे सरकार मनात आकस ठेवून काम करत नाही. तसेच, शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अतीशय संवेदनशील आहे. सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे आमचे ध्येय आहे.”