हल्लाबोल महामोर्चाचा व्हिडीओ म्हणून मराठा मोर्चाचा व्हिडीओ केला शेअर; काय म्हणाले फडणवीस?

मुंबई ,१८ डिसेंबर / प्रतिनिधी :- १७ तारखेला महाविकास आघाडीकडून भाजप विरोधात हल्लाबोल महामोर्चा काढण्यात आला होता. याला ‘नॅनो मोर्चा’ म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यानंतर आज १८ तारखेला शिवसेना ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, ‘देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.’ आता या व्हिडीओवर देवेंद्र फडणवीस यांनी तो व्हिडीओ मराठा क्रांती मोर्चाचा असल्याची शंका व्यक्त केली. यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी त्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हटलं होतं. त्यांनी जो व्हिडीओ ट्वीट केला तो मराठा मोर्चाचा व्हिडीओ आहे, अशी माहिती मिळाली. मला याबाबत काही कल्पना नाही पण असं कधी कधी होऊ शकते. कारण मोठा मोर्चा नव्हता, त्यामुळे व्हिडीओ दाखवायचा असेल तर तो दुसऱ्या मोर्चाचाच दाखवावा लागेल.” असा टोला त्यांनी लगावला. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक ट्विट करत म्हणले की, “मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान. न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला. तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!” असे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.

मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनीदेखील यावर आक्षेप घेतला. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक अंकुश कदम म्हणाले की, “संजय राऊत जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा. मराठा मोर्चाचे जुने व्हिडीओ टाकून जर तुम्ही शिल्लक सेनेची अब्रू वाचवण्याचा प्रयत्न करत असाल आणि राजकीय फायद्याचा विचार करत असाल तर हा तुमचा ढोंगीपणा आहे. ज्या मोर्चाची तुम्ही टिंगल केली, त्याच मोर्चाचा तुम्हाला आधार घ्यावा लागत आहे. या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो.”