नोरा फतेहीने जॅकलिन फर्नांडिसवर केला दाखल केला मानहानीचा दावा

मुंबई ,१२ डिसेंबर / प्रतिनिधी :-मनी लाँड्रिंग प्रकरणात गेले काही महिने प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही चांगलीच चर्चेत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात ती सहआरोपी असल्याचा आरोप तिच्यावर आहे. तिने केलेल्या याचिकेमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री नोरा फतेही हिचेदेखील नाव आले होते. यावरून तिची कसून चौकशीदेखील झाली होती. आता नोराने जॅकलिन फर्नांडिसवर मानहानीचा दावा दाखल केला आहे. जॅकलिनने तिची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

नोराने दाखल केलेल्या याचिकेत म्हंटले आहे की, “जॅकलिन फर्नांडिसने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझे करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तिने माझ्याबद्दल खोटे विधान केले जे अनावश्यक आणि अनुचित होते.” याचसोबत तिने १५ मीडिया हाऊसविरुद्ध बदनामीकारक टिप्पणी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सुमारे २०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सुकेश चंद्रशेखरला ‘ईडी’ने अटक केली. त्याचे अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांच्याशी त्याचे निकटचे संबंध असल्याचे ‘ईडी’ला आढळून आले होते. त्यानंतर या दोघींचीही चौकशी करण्यात आली होती.

जॅकलीन कोर्टात हजर पण सुनावणी पुढे ढकलली

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या सुनावणीसाठी सोमवारी पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. सुकेश चंद्रशेखर याने २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सहआरोपी जॅकलिनविरुद्ध आज न्यायालयात आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र ईडीच्या विनंतीवरून ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ईडीच्या विनंतीवरून या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. सुकेश बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या’ असे ईडीने एका निवेदनात म्हटले होते. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे. आता या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली.