राज्यपाल कोश्यारी आणि पंतप्रधान मोदी एकाच व्यासपीठावर; काय म्हणाले उद्धव ठाकरे?

मुंबई ,११ डिसेंबर / प्रतिनिधी :- नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासहित अनेक नेते उपस्थित होते. मात्र, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थित राहण्यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. “महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. याचा अर्थ काय? महाराष्ट्राने याचा अर्थ काय घ्यायचा?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. ठाणेमधील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, “एकीकडे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला आहे. त्यावर कोणीच भाष्य करत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे माज आल्यासारखी वक्तव्ये करतात. त्यावर आमचे मुख्यमंत्री गप्प आहेत. त्यांची नक्की भूमिका काय आहे? हे त्यांनी स्पष्ट करायला हवे. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभला आहे. मात्र याच महापुरुषांचा सातत्याने अवमान करण्यात येतो. राज्यपालांनी महाराजांचा अवमान केला, पण तेच राज्यपाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले दिसतात, मग आम्ही काय समजायचे?”