मी तुमची सगळी प्रकरणं बाहेर काढणार; शाईफेक घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांचे शरद पवारांना चॅलेंज

पुणे , ११ डिसेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी पुण्यामध्ये शाईफेक झाली आणि राज्यातले वातावरण चांगलेच तापले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. याचा विरोध म्हणून काही तरुणांनी त्यांच्यावर शाईफेक केली. आता या घटनेमागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस मला नेहमी टार्गेट करते. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे, म्हणून हे त्यांच्या डोळ्यात खुपत असावे. त्यांना महाराष्ट्रामध्ये घराणेशाही आणायची आहे. मी कुणालाही घाबरणार नाही, मी चळवळीतून आलेलो आहे. मी शरद पवारांना डायरेक्ट चॅलेंज करतो की, तुमची सगळी प्रकरणे मी बाहेर काढणार.” असा इशारा त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीला दिला आहे.

शाईफेक प्रकरणी ११ पोलिसांचे निलंबन

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींमध्ये समता सैनिक दल, वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, त्यांना तीन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश पिंपरी न्यायालयाने दिले. तसेच, याप्रकरणी ११ पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबनदेखील करण्यात आले आहे. यामध्ये ८ पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांची कडेकोट सुरक्षा भेदून झालेल्या या हल्ल्यानंतरही चंद्रकांत पाटील यांनी या सगळ्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे सांगितले होते.चोख बंदोबस्त असतानाही चंद्रकांत पाटील यांच्यावर मनोज गरबडे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी शाईफेक केली होती. त्यानंतर मनोज गरबडेसह आणखी दोन जणांना पोलिसांनी अटकही केली होती.

शाईफेक करणाऱ्या आरोपीवर कलम ३०७; सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप

पुण्यामध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर काही तरुणांनी त्यांच्यावर शाई फेकत त्यांच्या विधानाचा निषेध दर्शवला. यासंदर्भात तिघांना अटक करण्यात आली असून त्यातील एकावर कलम ३०७ म्हणजेच हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टीका करताना, राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. तरीही पिंपरी-चिंचवडमध्ये त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेचा मी निषेध करते. शाईफेक करणे या गोष्टीच समर्थन होऊ शकत नाही, मुळातच ही आपली संस्कृती नाही. पण, मला वाटत कायदा आता नियमानुसार चालत नाही. तर गृहमंत्र्यांच्या मर्जीनुसार चालतो. जो त्यांच्या विरोधात तोंड उघडतो, त्यांच्या मागे ईडी लावली जाते. विशेष म्हणजे, ईडीच्या ९५ टक्के केसेस या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच आहेत. मात्र, त्यांच्यामध्ये एखाद्या पक्षाचा नेता त्यांच्या पक्षात गेला की त्याला वॉशिंगमशीनमध्ये साफ केल्यासारखी क्लीन चीट दिली जाते, हे सारा देश पाहतो आहे. ही माहिती एका डेटावरून बाहेर आली आहे.”