जळगावमध्ये एकनाथ खडसेंना भाजपचा दणका; दूध संघाच्या निवडणुकीत खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांचा पराभव

भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय

जळगाव,११ डिसेंबर / प्रतिनिधी :- जळगावमधील जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा दणका बसला. भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने २० पैकी १६ जागांवर विजय प्राप्त केला. तर, एकनाथ खडसे यांच्या सहकार पॅनलला केवळ ४ जागांवर विजय मिळवता आला. हा खडसेंना भाजप-शिंदे गटाने दिलेला सर्वात मोठा दणका आहे. या निवडणुकीमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासह गुलाबराव पाटील, मंगेश चव्हाण, चिमणराव पाटील हेदेखील विजयी झाले. तर, दुसरीकडे खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांचा पराभव झाला.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवारांनी मुसंडी मारली आहे. 20 जागांपैकी 16 जागांवर भाजप शिंदे गटाच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर 4 जागांवर महाविकास आघाडीचे उमदेवार विजयी झाले आहेत. या निवडणुकीच्या निमित्तानं एकनाथ खडसे यांच्या गडाला सुरुंग लावला आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा जोरदार जल्लोष केला जात आहे.

निकालानंतर एकनाथ खडसे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, “आम्ही पारदर्शकपणे काम केले. पण, काही गोष्टींमध्ये आम्ही कमी पडलो. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे खोक्याचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. त्यात आम्ही कमी पडलो.” अशी टीका केली. यावर मंत्री गुलाबराव पाटील प्रतिउत्तर देताना म्हणाले की, ” एकनाथ खडसेंचे खोक्यात कमी पडलो, असे म्हणणे योग्य नाही. कारण, त्यांचे ४ प्रतिनिधी निवडून आले. याचा अर्थ त्यांनीही खोके वाटले का? जनतेने कामावर पसंती दिली आहे.” तर, ” या निवडणुकीमध्ये दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. लोकशाहीमध्ये सर्व नागरिक मिळून यश मिळते. फक्त मी – मी करून चालत नाही. मतदारांनी खडसेंचा हाच अहंकार मोडून काढला. हा पराभव म्हणजे त्यांच्या अहंकाराचा पराभव आहे,” असे मत चिमणराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात होती रस्सीखेच 

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत होते. त्यामुळं जळगाव जिल्ह्याचं राजकीय वातावरण चांगलचं तापलं होतं. दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच होती. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचं चित्र पाहायला मिळालं होते. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली होती त्यामुळं या निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या गटाचा पराभव करत भाजप आणि शिंदे गटाने विजय मिळवला आहे.