समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण; महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास

नागपूर ,११ डिसेंबर/ प्रतिनिधी :-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागपुरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. हा  520 किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा, नागपूर आणि शिर्डी यांना  जोडतो.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

“उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि नागपूर ते शिर्डी दरम्यानचा हा महामार्ग,  या प्रयत्नांचे एक उदाहरण आहे.  या अत्याधुनिक रस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करून महामार्गावर प्रवासही करुन पाहिला.  मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या पुढील आर्थिक प्रगतीसाठी हा प्रकल्प हातभार लावेल.”

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते.

कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी महामार्गाची पाहणी केली. तत्पूर्वी श्री. मोदी यांनी समृद्धी महामार्गावर झिरो पॉईंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य मान्यवर होते.

प्रधानमंत्र्यांनी घेतला ढोलताशाचा आनंद

कोनशिला अनावरणप्रसंगी प्रधानमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढोलताशा पथक ठेवण्यात आले होते. प्रधानमंत्र्यांनी स्वतः ढोल वाद्य वाजवत अनोखा आनंद घेतला. तसेच या पथकातील कलावंतांशी संवाद साधला. कार्यक्रमस्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अनावरण संपवून निघताना प्रधानमंत्र्यांनी नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी वाहन हळू करत नागरिकांना हात दाखवित त्यांचे अभिवादन स्वीकारले.

पार्श्वभूमी

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेसवे (महासंपर्क द्रुतगती महामार्ग)प्रकल्प,  हे देशभरातील संपर्क व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याचे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे.  सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किलोमीटर लांबीचा हा द्रुतगती महामार्ग, भारतातील सर्वात लांब द्रुतगती महामार्गांपैकी एक आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील 10 जिल्हे आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रामधून जातो.  या द्रुतगती महामार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांमधला संपर्क वाढण्यातही मदत होईल, परिणामी विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यात मदत होईल.

पंतप्रधान गती शक्ती योजने अंतर्गत, पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन आणि समन्वित अंमलबजावणीच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाला सामावून घेत, हा समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि अजिंठा एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार अशा पर्यटन स्थळांना जोडेल.  महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी समृद्धी महामार्ग हा एक महत्त्वाचा ‘गेम चेंजर’ प्रकल्प  ठरेल.