खासदारकी रद्द! महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी

कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवले 

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या  खासदार महुआ मोईत्रा  यांची कॅश फॉर क्वेरी म्हणजे पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात लोकसभेतून  हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या एथिक्स कमिटीच्या शिफारशीवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आज लोकसभेत या प्रकरणावर एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला.लोकसभेने विरोधी व सत्ताधारी पक्षांनी केलेल्या मतदानानंतर हा निर्णय घेतला.

मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आलेल्या “कॅश फॉर क्वेरी” प्रकरणात एथिक्स कमिटीच्या अहवालाने महुआ मोईत्रा यांच्या अनैतिक वर्तनाची चौकशी करण्याची आणि लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली होती. सरकारी चौकशीची मागणी करताना त्यात म्हटले होते की, महुआ मोईत्राच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने तीव्र, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करावी. समितीने महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यातील रोख व्यवहारांच्या ‘मनी ट्रेल’ची चौकशी करण्याची शिफारसही केली आहे.

या प्रकरणात विरोधी सदस्यांनी मोईत्रा यांना पाठिंबा दर्शवला, तर एनडीएच्या मित्रपक्षांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत हा मुद्दा उपस्थित केला. एनडीएच्या मित्रपक्षांनी मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले, तर विरोधी सदस्यांनी मतदानादरम्यान मौन पाळले. तर अनेक सदस्यांनी मोईत्रा यांनी बोलण्याची परवानगी न दिल्याने सभात्याग केला.

“खासदार महुआ मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अशोभनीय होते हा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून राहणे योग्य नाही,” असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निर्णय जाहीर करताना सांगितले.

खासदार शसिकांत दुबे यांनी पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप केला होता. मोइत्रा यांच्याकडून मात्र हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. मात्र उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी आपण संसदेचं लॉगइन आणि पासवर्ड दिल्याची कबुली दिली होती. याच बरोबर या पोर्टलवरुन कुणालाही लॉगइन करता येईल, कोण करु शकेल आणि कोण करु शकत नाही, असा कसलाही नियम नाही, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र नीतिमत्त समितीने आज संसदेत आपला अहवाल सादर करत महुआ मोइत्रा यांचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मांडला, त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

महुआ मोईत्रा यांच्यावर नेमके काय आरोप?

उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूलच्या खासदाराला म्हणजेच मोईत्रा यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.

महुआ मोइत्रा यांची प्रतिक्रिया

महुआम मोइत्रा यांनी लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्याच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, “माझ्याविरोधात कोणताही पुरावा नाही. मी संसदेत गौतमी अदानी यांचा मुद्दा उपस्थित केला होता आणि भविष्यात देखील मी त्यावर बोलणार आहे. केवळ संसदेचं लॉगइन आणि पासवर्ड शेअर केल्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत कोणताही संसदीय नियम नाही.”

दरम्यान, महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयानंतर विरोधी पक्षातील खासदारांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करच वॉकआऊट केलं.