मुंबई-पुणे महामार्गावर वेगमर्यादा १००, मग समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा १५० का? अजित पवारांचा सवाल

मुंबई ,११ डिसेंबर / प्रतिनिधी :- आज नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. याआधी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल १५०च्या वेगाने समृद्धी महामार्गावर गाडी चालवत पाहणी केली होती. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टोला लगावत वेगमर्यादेवर प्रश्न उपस्थिती केला आहे. तसेच, समृद्धी महामार्गाच्या श्रेयवादावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावर चढाओढ होत असलेल्या चर्चेचेदेखील खंडन केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, “समृद्धी महामार्गाच्या कामावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये स्पर्धा असेल, असे मला वाटत नाही. कारण, दोघांनीही एकत्रच रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी वाहन चालवण्याचे काम फडणवीस यांनी केले होते. त्यात गाडीचा वेग हा तब्बल १५० पर्यंत होता.” असे म्हणत त्यांनी टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, “मला प्रश्न पडतो की, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीची वेगमर्यादा ही १००, तर इतर काही महामार्गांवर ८० आहे. पण समृद्धी महामार्गावर गाडीचा वेग १५०, एवढी तफावत का? नेमके कुठल्या निकषावर ही वेगवेगळी वेगमर्यादा लादण्यात आली? माझी चर्चा त्यांच्याशी झाली की, मी त्यांना नक्की विचारेन यामागे नेमके गमक काय? लोकांनी नक्की काय समजावे? उद्या कोणतरी यावर न्यायालयात गेले, तर तिथे उत्तर द्यावे लागेल. प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेचा विचार झालाच पाहिजे. सरकारने त्यासाठी निर्णय घ्यावेत. त्यासाठी आमचा पाठिंबा असेल.”