नाशिकमध्ये विचित्र अपघातात एसटी बस जळून खाक; २ दुचाकीस्वार ठार

नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील नाशिक रोडपासून काही अंतरावर राजगुरू नगर-नाशिक या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसला झालेल्या विचित्र अपघातातएसटी बस जळून खाक झाली. तर या अपघातात २ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्व ४३ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जिवीत हानी टळली; या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी आहे. तर, बसमधील ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने शिंदे पळसे गावाच्या हद्दीत बसने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक आहे. आज दुपारी १२.३० वाजता ही दुर्घटना घडली असून नाशिक शहरापासून केवळ ६ ते ७ किमी अंतरावरील हा अपघात झाला आहे.

अपघातानंतर घटनास्थळावरच बसला भीषण आग लागली. त्यामध्ये बस संपूर्ण जळून खाक झाली. या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाली असून आठ ते दहा लोकांना जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून बघ्यांचीही गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

या बस अपघातात हर्षदा मंगेस पोंदे, संगमनेर, रुपाली सचिन दिवटे, अकोले, समृद्धी सचिन दिवटे, सईदा इनामदार, संगमनेर, मुस्तफा शेख, संगमनेर, नसमा जहाँगिरदार, संगमनेर, औवेस अहमद, धारावी मुंबई, सिताराम देवराम कुरणे, सिकर हे प्रवासी जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर अपघातस्थळी अग्निशमन दल, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका दाखल झाल्या. त्यांनी तातडीने बसची आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. जखमींवर बिटको हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत. राजगुरुनगर-नाशिक बसचे चालक राजेंद्र अंबादास उईके यांनी सांगितले, की,‘‘पळसे चौफुलीच्या बस थांब्याजवळील गतीरोधक पाहून मी बसचा ब्रेक दाबला, पण ब्रेक न लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरील बसवर ही बस धडकली.’’

ऑक्टोबर महिन्यातही बस जळाली

ऑक्टोबर महिन्यात नाशिक शहराजवळच औरंगाबाद महामार्गावरील तपोवन येथे एका खासगी बसला असाच भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये १३ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता, या घटनेनं महाराष्ट्र हादरला होता. या घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली.