मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात:१० व्यक्तींचा मृत्यू जागीच मृत्यू; तर १८ जण जखमी

धुळे : राज्यात भीषण अपघातांची मालिका सुरुच आहे. त्यातच आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास धुळे येथे मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात १० जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला आहे. तर या भीषण अपघातात १८ जण जखमी झाले आहेत.

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर हे गाव मध्य प्रदेशच्या सीमेवर येतं. याच गावाजवळ साधारणतः सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही अपघाताची घटना घडली. आग्राकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या १४ चाकी कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने या कंटनरने सुरुवातीला समोर चालणाऱ्या दोन वाहनांना उडविले. त्यानंतर रस्त्यालगत असलेल्या हॅाटेलमध्ये हा कंटेनर घुसून बाहेर पडला.

या अपघातात आधी पाच जणांचा जागीच चिरडून मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत होती. मात्र आता मृतांची संख्या वाढली असून आता मृतांचा आकडा १० वर पोहोचला आहे. अपघात काहीजण जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून सध्या अपघातस्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जखमींच्या उपचारावरील खर्च शासनमार्फत करणार – पालकमंत्री गिरीष महाजन

धुळे :- धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील अपघात ही अतिशय दुदैवी घटना आहे. या अपघातात 10 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 15 जण येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर 3 जण सिध्देश्वर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या जखमींची आज सायंकाळी ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी रुग्णालयात जाऊन आस्थेवाईकपणे चौकशी केली.

पळासनेर येथे कंटेनर हॉटेलमध्ये शिरल्याने आज सकाळी हा अपघात झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये वाहन चालक, क्लिनरसह शाळकरी मुलांचाही समावेश असून मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. तसेच जखमींवर शासनामार्फत उपचार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात येणार आहे. या अपघाताची चौकशी करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अश्विनी पवार, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण मोरे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, अनुप अग्रवाल आदी उपस्थित होते.

धुळे-पळासनेर येथील अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत

मुंबई – धुळे जिल्ह्यातील पळासनेर येथे मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.  या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जाहीर केली आहे.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींवर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.