भरधाव टेम्पोची धडक ; दोन शेतमजूर महिला जागीच ठार, साकेगाव- मनूर रस्त्यावरील घटना

वैजापूर,​६​ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शेतात मोलमजुरी करुन उपजिविका भागवणा-या दोन शेतमजूर महिलाना भरधाव वेगाने टेम्पोने चिरडल्यामुळे त्या दोघींचा ठार झाल्याचा भीषण अपघात साकेगाव – मनुर रस्त्यावर घडला. ठगनबाई विश्वनाथ दवंगे (56), मंगल आसाराम दवंगे (38) या दोघी नात्याने चुलती पुतणी होते. रस्ते अपघातात सांयकाळी घराकडे परतताना काळाने त्यांच्यावर मुत्युची झडप घातली.

टेम्पो (क्र.एम.एच. 21 डी. 911)  या वाहनाने जोराची त्यांना धडक दिल्यावर चालकाने वाहन जागेवर सोडुन पळ काढला. ठगनबाई दवंगे यांच्या पतीचे निधन झालेले आहे. त्यांना दोन मुले असून दोन्ही अविवाहित असल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला.तर मंगलबाई दवंगे यांना पती नांदवत नसल्याने माहेर राहुन मोल मजुरी करुन त्यांचा उदरनिर्वाह करीत होत्या.

अपघाताची माहिती मिळल्यावर  शिऊर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पाटील,उपनिरीक्षक अंकुश नागटिळक, जमादार गणेश गोरक्ष, पैठणकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मणुर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. या प्रकरणी वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.