जी-२० परिषद : महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती आणि प्रगती जागतिक पातळीवर पोहोचवण्याची संधी

जी २० परिषद : सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमानभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

मुंबई ,६ डिसेंबर​ ​/ प्रतिनिधी :- भारताला प्रथमच जी-२० परिषदेचे अध्यक्षपद दिनांक ०१ डिसेंबर, २०२२ ते ३० नोव्हेंबर, २०२३ या कालावधीसाठी मिळाले असून त्यानिमित्त देशातील विविध ठिकाणी या परिषदेच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात एकूण १४ बैठका होणार असून, बैठकांचा पहिला टप्पा मुंबई येथे १३ डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध देशातून येणाऱ्या प्रतिनिधींना महाराष्ट्राचा वारसा, संस्कृती, परंपरा, वाटचाल आणि प्रगतीची माहिती व्हावी यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून तयारी करण्यात येत आहे. एकप्रकारे महाराष्ट्राचे ब्रॅंडींग यामधून करण्यात येणार आहे.

राज्य शासनाचे विविध विभाग आणि ज्या शहरांत बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे, तेथील महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा वारसा आणि विविध क्षेत्रात प्रगतीच्या दिशेने सुरु असलेली आगेकूच याचे दर्शन या परिषदेसाठी येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचवले जाणार आहे. राज्यात होणारी पहिली बैठक 13 ते 16 डिसेंबर दरम्यान होणार असून, त्यासाठी विविध देशातील 200 हून अधिक प्रतिनिधी दाखल होणार आहेत. या परिषदेच्या मुंबई येथे होणाऱ्या बैठकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मरिन ड्राईव्ह, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय यासह जी-20 परिषदेच्या मार्गावर असणारी सर्व ऐतिहासिक वारसास्थळे, स्मारके यांचे सुशोभीकरण मुंबई महानगरपालिकेच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून केले जाणार आहे. तसेच, बांद्रा-कुर्ला संकुलातील विविध उद्योग समूहांच्या इमारतींवर रोषणाई, कान्हेरी लेणी मार्गाचे सुशोभीकरण, राजीव गांधी सेतू आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.

राज्याच्या सांस्कृतिक कलेची ओळख परिषदेसाठी आलेल्या मान्यवरांना व्हावी, यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दि. 13 डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया जवळील हॉटेल ताज येथे महाराष्ट्रातील लोककलांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहेत तर दिनांक 14 डिसेंबर रोजी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक टेरेन्स ॲन्ड लुईस यांचे सादरीकरण असलेला कार्यक्रम वांद्रे येथील हॉटेल ताज एन्ड येथे होणार आहे.

उद्योग विभागाच्या वतीने कार्यक्रमस्थळी तसेच मान्यवरांची निवास व्यवस्था असलेल्या ठिकाणी असे एकूण 4 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील हस्तकला कलाकुसरीच्या वस्तू या ठिकाणी प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शहरातील महत्वाच्या ऐतिहासिक स्थळे आणि स्मारकांचे सुशोभीकरण, रस्त्यांची दुरुस्ती आणि सुशोभीकरण, वाहतूक बेटांचे सुशोभीकरण, पदपथांची रंगरंगोटी, परिषदेच्या मान्यवरांची निवासव्यवस्था आणि बैठक ठिकाण या मार्गावर फुलझाडे लावण्यात येणार आहेत. विद्‌यार्थ्यांना ही माहिती मिळावी यासाठी विविध शाळा –महाविद्यालयात जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही परिषद सर्वसमावेशक, कृती केंद्रीत आणि निर्णायक ठरावी आणि पर्यावरणीय बदल, साथरोग, दहशतवाद या विषयांवर चर्चा घडून यावी यादिशेने प्रयत्न करणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची ठळक ओळख जागतिक पातळीवर अधोरेखित व्हावी, यासाठी ही परिषद उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटले आहे. त्यादृष्टीने विविध विभागांनी तयारी सुरु केली आहे.

सर्वपक्षीय बैठकीस गैरहजर राहून उद्धव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्राचा अपमानभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

नवी दिल्ली,६ डिसेंबर  /प्रतिनिधी :-जगातील प्रगत राष्ट्रांच्या जी २० परिषदेचे अध्यक्षपद भारताकडे आले असून त्या निमित्ताने राज्याचा विकास आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे. या संदर्भात आयोजित सर्वपक्षीय बैठकीला केंद्र सरकारने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण देऊनही ते बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःच्या राजकारणाला महत्त्व देऊन उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा अपमान केला आहे, त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना केली.

चंद्रशेखर बावनकुळे पक्षाच्या उच्चस्तरीय संघटनात्मक बैठकीसाठी नवी दिल्ली दौऱ्यावर आहेत.

ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या चार ठिकाणी जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. यानिमित्ताने राज्यातील विकासाचे प्रकल्प आणि आपली संस्कृती जगासमोर मांडण्याची संधी आहे. जी २० परिषदेच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्याला भाजपाखेरीज इतर अनेक प्रमुख पक्षांचे नेते उपस्थित होते. परंतु निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना निमंत्रण होते. त्यांना काही कारणाने उपस्थित राहता आले नसेल तर पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित रहायला हवे होते. पण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदावर राहिलेल्या या दोन्ही नेत्यांनी बैठकीस गैरहजर राहून महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागितली पाहिजे.

जी २० संबंधी बैठकीसाठी विविध पक्षांना निमंत्रण होते. बैठकीस भाजपाचे विरोधक असलेले काँग्रेस, ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस, बिजू जनता दल अशा पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले पण उद्धव ठाकरे आणि शरद पवार गैरहजर राहिले, याविषयी प्रतिक्रिया काय असे विचारले असता प्रदेशाध्यक्षांनी मतप्रदर्शन केले.

ते म्हणाले की, महाराष्ट्राला या परिषदेतून खूप काही मिळणार आहे. अशा वेळी उद्धव ठाकरे आणि अजित पवार का उपस्थित राहिले नाहीत, हे त्यांनी सांगितले पाहिजे. या बैठकीच्या ऐवजी उद्धव ठाकरे दिवसभर प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आणि महाविकास आघाडीची बैठक यात गुंतलेले राहिले. या बैठका नंतरही झाल्या असत्या. महाराष्ट्राच्या हिताच्या महत्त्वाच्या बैठकीस गैरहजर राहणे हा राज्याचा अपमान आहे. हे निषेधार्ह आहे.

महाविकास आघाडी मोर्चा काढणार असल्याबद्दल विचारले असता प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मोर्चा कशासाठी काढणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपावरून महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक यांना अटक झाली तर शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळले नाही. त्यावेळी कधी उद्धव ठाकरे यांना निषेध करावासा वाटला नाही आणि आता कशासाठी मोर्चा काढत आहेत ?