पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी; कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. 23 : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

पोहरादेवी येथील संजय राठोडांच्या शक्तिप्रदर्शनाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगीन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी सांगितले.

संजय राठोड पोहरादेवीत ; गडावर शक्तीप्रदर्शन ,समर्थक- पोलिसांमध्ये धक्काबुकी 

वनमंत्री संजय राठोड (Sanjar Rathod Reached Poharadevi Temple)  अखेर पोहरादेवीत दाखल झाले आहे. याठिकाणी संजय राठोड यांच्या समर्थनार्थ गडावर हजारो कार्यकर्ते दाखल होते. संजय राठोड यांच्या समर्थनार्थ उपस्थित असलेल्या कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुकी झाली. यावेळी समर्थकांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले आणि संजय राठोड यांचं जल्लोषात स्वागत केलं.  

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी झालेल्या आरोपांबाबत वनमंत्री संजय राठोड चौकशीला सामोरं जातील असे संकेत मिळत आहेत. राठोड यांनी चौकशीला सामोरं जावं अशी सूचना पोहरादेवी संस्थानने केली आहे.संजय राठोड यांच्यावरील ईडापिडा टळू दे आणि त्यांच्यावरील संकट दूर होऊ दे यासाठी पोहरादेवी गडावर महंतांकडून होमहवन केलं जातं आहे. एवढंच नव्हे तर राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट टाकल्याचं दिसून येत आहे. संजय राठोड शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा झाली. पोहरादेवी गडावर संजय राठोड यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. तसंच संत महंतांनी होमहवन सुरू केलं आहे.  वनमंत्री संजय राठोड यांची यवतमाळच्या निवासस्थानी शिवसेना पदाधिका-यांशी चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय झालं? याकडे ही साऱ्यांचं लक्ष आहे.