रोजगार हमी योजनेची कामे ग्रामसेवकांनी अधिक गतीने करावी – मंत्री संदिपान भुमरे

मुंबई ,३० नोव्हेंबर / प्रतिनिधी :-राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामसेवकांची भूमिका महत्त्वाची आहे. या योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गती वाढवावी, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिले.

रोहयो मंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शासकीय निवासस्थानी ग्रामसेवक संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजय बनसोड, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के.पी.मोते, परिमल सिंह यांच्यासह रोहयो आणि फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ग्रामसेवकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक विचार करण्यात येईल. ग्रामसेवकांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सोपविण्यात आलेली कामे गुणवत्तापूर्ण आणि अधिक गतीने करावीत. इतर राज्यात ज्याप्रमाणे उपलब्ध निधी पूर्ण खर्च होईल अशा पद्धतीने कामे करतात त्याप्रमाणे आपल्या राज्यातील कामे करण्यासाठी अभ्यास करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करणे आणि सर्व कामगारांच्या हजेरीपत्रकावरील प्रतिस्वाक्षरी करणेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यात आधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यासाठी सादरीकरण करण्यात आले. मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, ज्या ज्या ठिकाणी खाजगी आधुनिक कांदाचाळ निर्माण करण्यात आली आहे. त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास करण्यात यावा. फलोत्पादन विभागामार्फत प्रायोगिक तत्त्वावर एक आधुनिक कांदाचाळ निर्माण करुन त्याचा खर्च, कांद्याची सुरक्षितता, शेतकऱ्यांना होणारा फायदा – तोटा आदी अभ्यास करण्याच्या सूचना मंत्री श्री.भुमरे यांनी दिले.