उच्च शिक्षण संस्थांनी अध्यापनासाठी ऑनलाईन साधने वापरावीत – राज्यपाल

‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नवयुगातील साधने‘ या विषयावरील चर्चासत्राचे राजभवन येथून उद्घाटन

मुंबई, दि. २८ : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये तसेच उच्च शिक्षण संस्थांनी अध्ययन तसेच अध्यापनासाठी आधुनिक डिजिटल नव साधनांचा स्वीकार करावा. आयआयटीसारख्या संस्थांनी देखील ऑनलाईन अध्यापनाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र, नवे तंत्रज्ञान सुसंवादी, प्रमाणित आणि व्यवहार्य आहे का याचा देखील साकल्याने विचार करणे आवश्यक आहे, असे मत राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

अकादमीस्थान फाऊंडेशन या उच्च शिक्षण संस्थांमधील शिक्षकांसाठी ऑनलाईन व्यासपीठाचे कार्य करणाऱ्या संस्थेने आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन अध्यापनाकरिता नवयुगातील साधने‘ या विषयावरील चर्चासत्राचे (वेबिनार) राजभवन येथून उद्घाटन करताना राज्यपाल बोलत होते.

परीक्षा न देता विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर त्यांना स्वत:ला खचितच समाधान लाभणार नाही, असे नमूद करून आजच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर करुन परीक्षा घेणे व त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांकडे संगणक नाही त्यांना संगणक पुरवून परीक्षा घेणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.    

कालप्रवाहानुसार अनेक गोष्टी बदलत असतात परंतु अध्यापनात काही गोष्टी शाश्वत असतात, असे सांगून नवतंत्रज्ञान स्वीकारताना शिक्षणातील शाश्वत मूल्ये जपली पाहिजेत, असेही मत राज्यपालांनी यावेळी मांडले.

लहान मुलांच्या नेत्र आरोग्याचा विचार करून लहान मुलांच्या अध्यापनासाठी ऑनलाईन साधने खरोखरीच उपयुक्त आहेत का याचा विचार होणे गरजेचे आहे, असेही मत राज्यपालांनी व्यक्त केले.  

‘ऑनलाईन अध्यापन साधने व त्यांचे उपयोग‘, ‘उत्तम शैक्षणिक सामग्रीची निर्मिती‘, ‘विद्यार्थी सुसवांद व सहअध्ययन‘ या विषयावरील या तीन दिवसांच्या कार्यशाळेला देशभरातून ६००० शिक्षक सहभागी होत असल्याची माहिती अकादमीस्थान फाऊंडेशनचे संस्थापक व मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीवरील कुलपतींचे सदस्य दीपक कुमार मुकादम यांनी दिली. चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याला विविध विद्यापीठांचे कुलगुरु, प्रकुलगुरू व शिक्षक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *