राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन खरीपाचे कर्ज माफ करावे-अजितदादांनी केली मागणी

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी -अजितदादा पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या शिबिराचा पहिला दिवस

शिर्डी ,४ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी गेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आधार, दिलासा देण्यासाठी, राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण केली. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर, राज्यातला नुकसानग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, हे वास्तव आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी, अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या शिबिराला पक्षाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी संबोधित केले. ‘सबका मालिक एक…’, ‘श्रद्धा आणि सबुरी..’ सारखा संदेश देणाऱ्या, अध्यात्माच्या माध्यमातून लोकसेवेचा डोंगर उभा करणाऱ्या, श्री साईबाबांच्या पवित्र शिर्डी नगरीत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश शाखेतर्फे आयोजित, ‘राष्ट्रवादी मंथन–वेध भविष्याचा’ अभ्यास शिबिर होत आहे.महाराष्ट्राच्या कल्याणासाठी पांडुरंगाला साकडं घालतो. हे बा-पांडुरंगा, महाराष्ट्रावर तुझी कृपा कायम ठेव, राज्याची भरभराट कर, शेतकऱ्याला, कष्टकऱ्याला यश दे, प्रत्येक घरात सुख-शांती येऊदे. धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी होऊदे, महागाई, बेरोजगारीचं राज्यावरचं संकट दूर कर, अशी प्रार्थना मी बा विठ्ठलाच्या चरणी करतो.

‘मंथन’ म्हटलं की पुराणातली ‘समुद्रमंथना’ची गोष्ट आणि त्या मंथनातून निघालेल्या अमृत आणि विषाची कथा आठवण्याची शक्यता आहे. पुराणातल्या त्या ‘समुद्रमंथना’शी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वैचारिक ‘मंथना’चा काहीही संबंध नाही. आपलं ‘मंथन’ हे विचारांचं मंथन आहे. या मंथनातून, देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या भल्यासाठी, चांगलं शोधण्याचा, खुप काही चांगलं करण्याचा हा प्रयत्न आहे. येणाऱ्या भविष्यकाळात पक्षवाढीसाठी, राज्याच्या विकासासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काय केलं पाहिजे. पक्षकार्यकर्त्यांची भूमिका कशी असली पाहिजे. कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी कसं वागलं पाहिजे, कोणत्या पद्धतीनं विचार केला पाहिजे, सत्यशोधक विचारांची कास कशी धरली पाहिजे, हे ठरवण्यासाठी हे मंथन शिबिर आहे. सध्याच्या राजकीय, सामाजिक पार्श्वभूमीवर, पक्षाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेऊन, पक्षाची, पुढच्या वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी हे अभ्यास शिबिर महत्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पक्षाची ध्येय-धोरणं माहित असली पाहिजेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक प्रश्नांकडे, कार्यकर्त्यांनी चिकित्सक पद्धतीनं बघितलं पाहिजे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संविधान आणि लोकशाहीच्या मुल्यांबाबत सजग असला पाहिजे. यासंबंधीची जाणीव निर्मिती आणि जाणीव जागृतीसाठी हे मंथन शिबिर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याला त्यांची जबाबदारी समजावून सांगण्यात आणि ती पार पाडण्याचं बळ देण्यात, प्रदेश राष्ट्रवादीनं आयोजित केलेलं हे ‘राष्ट्रवादी मंथन–वेध भविष्याचा’ अभ्यास शिबिर यशस्वी होईल, असा विश्वास अजितदादा यांनी व्यक्त केला.

अजितदादा म्हणाले, या शिबिरात आपल्यसमोर बोलण्यासाठी ‘राज्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुका’ हा विषय मला दिला आहे. अनेक कारणांसाठी हा विषय महत्वाचा आहे, असं मला वाटतं. येणाऱ्या काळात, लवकरच, राज्यातल्या २३ महानगरपालिका, २२१ नगरपरिषदा-नगरपंचायती, २५ जिल्हा परिषदा, २८४ पंचायत समित्या आणि ७ हजार ५०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांची पूर्वतयारी या शिबिरातून आपल्याला करायची आहे. सर्वोच्च न्यायालयानं सद्यस्थितीत, ग्रामपंचायती वगळता, इतर स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांबाबत ‘जैसे थे’ आदेश दिला आहे. असं असलं तरी, ही स्थगिती कधीही उठू शकते. निवडणुका एक-दोन महिन्यात जाहीर होऊ शकतात, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिलं पाहिजे. मला आनंद आहे की, अनेक ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. ही आघाडी आणि वेग आपल्याला टिकवायचा आहे. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीतून, पक्षाच्या गाव, शहर, तालुका, जिल्हा पातळीवरील अधिकाधिक कार्यकर्त्यांना, सत्तेत येण्याची, लोकसेवा करण्याची संधी मिळत असते. स्थानिक स्वराज संस्थांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हेच स्थानिक सत्तेच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी, पक्षाच्या बळकटीकरणासाठी ताकद देत असतात. याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून भविष्यातले आमदार, खासदार पक्षाला मिळत असतात. त्यातून पक्षसंघटन वाढते. स्थानिक स्वराज संस्थांमधलं यशंच, येणाऱ्या काळात पक्षाची, लोकसभा, विधानसभा निवडणुकीची वाट सोपी करणार आहेत, हे लक्षात घेऊन अधिकाधिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता आणि ग्रामपंचायतीत आपल्या विचारांची माणसं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अजितदादांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले. सन्माननीय प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली, माझ्यासह, पक्षाच्या जिल्हा, तालुका अध्यक्षांपासून बुथ-मतदार यादी लेव्हलपर्यंतच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनं, आतापासून कामाला लागावे. मतदार यादी बुथप्रमुख, पन्ना प्रमुख यांच्याशी स्थानिक नेतृत्वाने संपर्कात राहावे. त्यांच्या अडचणी दूर करण्याचा, त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करावा, असे अजितदादांनी सांगितले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज्य व्यवस्था आणली. स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं काम केले. नंतरच्या काळात शरद पवार यांचे नेतृत्व, मार्गदर्शनात महिलांसाठी स्थानिक स्वराज संस्थांमध्ये, महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्याचा क्रांतिकारी निर्णय आपण घेतला. हा निर्णय महिलांपर्यंत, घराघरात पोहचवला पाहिजे. आज स्थानिक स्वराज संस्थांमध्ये 50 टक्के महिला निवडून येतात. त्या जागांवर, राष्ट्रवादीच्या विचारांच्या उमेदवार अधिकाधिक निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. महिलांच्या सक्षमीकरणसाठी राष्ट्रवादीने केलेले कार्य घराघरात पोहचवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

राज्याच्या ज्या मंत्रालयात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे , (अगदी देवेंद्र फडणवीस ) यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या अधिकार, मानसन्मानाचे अनेक निर्णय घेतले. महाराष्ट्राचं मंत्रालय जे आजपर्यंत पुरोगामी निर्णयांसाठी ओळखलं जायचं… त्याच मंत्रालयात एका महिला पत्रकाराला, एक व्यक्ती, भारतमाता विधवा नाही. तुम्ही कुंकु-टिकली लावून या मगच मी बोलेन… अशा पद्धतीची भाषा वापरतो. हे गंभीर, निषेधार्ह आहे, अशी भूमिका अजितदादांनी मांडली.

स्थानिक स्वराज संस्थांमध्ये ओबीसी बांधवांना आरक्षण मिळाला पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका राहीली आहे. मंडल आयोगावेळी ओबीसी आरक्षणाची बाजू उचलून धरण्याचं काम शरद पवार आणि भुजबळ यांनी केलं होतं. मंडल आयोग ते बांठिया आयोग, असा हा राष्ट्रवादीचा प्रवास कायम ओबीसी बांधवांच्या बाजूचा राहिला आहे. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडी सरकारने, राज्यात बांठिया आयोग स्थापन करून, त्यांच्या अहवालाच्या आधारे ओबीसी बांधवांनाना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आरक्षण मिळवून दिलं. आज भलतेच लोक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी आरक्षणाला कायम विरोध केला, अशी टीका करत ओबीसींच्या मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या त्या ढोंगी लोकांचा बुरखा फाडण्याचं काम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे, असे आवाहन उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे; हे खरं असलं तरी राज्य शासन आणि न्यायालयांनीही त्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण राज्य निवडणूक आयोगाला त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी, या सगळ्यांकडून सहकार्याची अपेक्षित असते. मला वाटतं की, निवडणुका लांबविणे ही सध्याच्या शिंदे सरकारची गरज झाली आहे. त्यांना जनाधार नाही. लोकांची सहानुभूती महाविकास आघाडीकडे आहे, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय त्यांची चूकही त्यांना उमगली आहे; पण ते जाहीरपणे कबूल करू शकत नाही. सरकारं येतात जातात; निवडणुकीत मतदारांनी विजयी कौल दिल्यावर सरकार येते, ते खरे कर्तृत्व असते. त्यात आनंद असतो किंवा पराभव झाला तरी तोही जनतेचा कौल असतो; पण गुवाहाटीला जाऊन सरकार पाडणे म्हणजे ही चोरवाट आहे, अशा शब्दांत अजितदादांनी टीका केली.

मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात राज्यात येऊ घातलेले चार मोठे प्रकल्प गुजरातला दिले गेले. इथल्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवले गेले. हेच आपल्याला जनतेपर्यंत पोहचवायचे आहे. या प्रकल्पांसाठी दिल्लीला जावून पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांना भेटण्याचं, त्यांच्याकडे मागणी करण्याचं धाडसही राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दाखवू शकत नाहीत. हे महाराष्ट्राचं दुर्दैवं आहे. हे शिंदे सरकार जितकं सत्तेवर राहील, तितकं अधिक महाराष्ट्राचं, इथल्या जनतेचं नुकसान करत राहतील, ही राज्यातल्या जनतेची लोकभावना आहे, असे अजितदादा म्हणाले.

राज्याच्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. महापुर आला. शेतकऱ्यांचं खरीपाचे पिक पूर्णपणे वाहून गेले आहे. पशुधन वाहून गेलं. शेतजमीनी पिकासह खरवडून गेल्या आहेत. येणाऱ्या काही वर्षात या जमीनींचं नुकसान भरुन येणार नाही. लोकांच्या घरांचं, दुकानांचं नुकसान झालं आहे. रबी हंगामात पेरणी झालेल्या पिकाचंही नुकसान झालं आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्जाची परतफेड करणं शक्य नसल्यानं, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी काळी गेली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना आधार, दिलासा देण्यासाठी, राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आपण केली. ओला दुष्काळ जाहीर झाला नाही तर, राज्यातला नुकसानग्रस्त शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही, हे वास्तव आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन, खरीपाचे कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना प्रति एकर 50 हजार रुपये मदत करावी, अग्रीमसह शेतकऱ्यांना विमा भरपाई द्यावी, अशी मागणी अजितदादांनी केली.

यासंदर्भात, मी दिवाळीआधी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन पत्र दिलं होतं. त्या मागणीचा अजून विचार झाला नाही, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना, दिवाळीत दिलासा देण्याची संधी, राज्य सरकारनं गमावली, हे राज्यातल्या शेतकऱ्यांचं आणि १३ कोटी जनतेचं दुर्दैवं आहे. ही वस्तुस्थिती आपापल्या मतदारसंघातल्या मतदारांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे.

राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली- जयंतराव पाटील

आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टीका होत आहे असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिराला आजपासून शिर्डी येथे सुरुवात झाली. या शिबिराच्या सुरुवातीला झेंडावंदन पार पडले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले.

राष्ट्रवादी पक्षाला २३ वर्ष झाली आहेत. शरद पवार या शिबिराला कालच येणार होते. मात्र ते उद्या येऊन मार्गदर्शन करतील असेही जयंतराव पाटील यांनी सांगितले.

राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत व अस्वस्थ आहे याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी सरकारला विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी सरकारला निवेदन दिले मात्र सरकारने अद्याप ओला दुष्काळ जाहीर केला नाही याबद्दल तीव्र नाराजी जयंतराव पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या मंत्र्यांनी चांगले काम केले हे जनतेला सांगण्याची गरज आहे. आपल्या पक्षाच्या माध्यमातून झालेली कामे पोहोचवा, ती लोकांपर्यंत जायला हवीत असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी केले.

शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केले. त्या बंडखोरीशी काही संबंध नाही म्हणणारे भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू हे एका फोनवर गुवाहाटीला गेले हे जाहीर सांगतात यावरून या बंडामागे कोण होतं हे लक्षात येते असेही ते म्हणाले.

या शिबिराला पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार सुनिल तटकरे, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री आदिती तटकरे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार आशुतोष काळे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, पक्षाचे सर्व आमदार, माजी आमदार, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष, प्रवक्ते, सरचिटणीस, फ्रंटल सेलचे राज्यप्रमुख, संघटक सचिव, महिला प्रदेशाध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष, युवती प्रदेशाध्यक्ष, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष आदींसह सर्व निमंत्रित उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘राष्ट्रवादी मंथन-वेध भविष्याचा’ या शिबिराचे शिर्डी येथे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल पटेल, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रमुख नेते, आमदार व खासदार उपस्थित होते.