लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खाजगी रुग्णालयांचा सहभाग वाढविण्याच्या सूचना

राज्ये / केंद्र शासित प्रदेशांमधील लसीकरणाच्या प्रगतीचा केंद्र सरकारकडून आढावा

नवी दिल्ली,३१ मे /प्रतिनिधी:-

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार्याने सुरु असलेल्या कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी सक्रिय मार्गदर्शन, आढावा आणि देखरेख ठेवण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आज  लसीकरणाच्या प्रगतीबाबत राज्ये आणि  केंद्रशासित प्रदेशांमधील प्रशासकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली.लसीकरणाची गती वाढविण्याच्या दृष्टीने राज्यांना देण्यात आलेल्या अधिक लवचिक  धोरणाच्या वेळापत्रकाद्वारे जून 2021 साठी वाढीव लसीचा पुरवठा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केल्याच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. केंद्रीय आरोग्य सचिव श्री राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.लसीकरण मोहीम गतिमानतेने सुरु राहण्यासाठी राज्य आणि  केंद्रशासित प्रदेशांना त्यांचा कमी होणारा लसीचा साठा पुन्हा भरण्यासाठी, केंद्र सरकार लसीचा अतिरिक्त साठा तातडीने उपलब्ध करुन देईल, असे आश्वासन आरोग्य सचिवांनी या बैठकीत दिले.

घराजवळील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याची आणि या लसीकरण केंद्रांचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती करण्याची विनंती  राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना करण्यात आलीआहे.

कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी खाजगी रुग्णालयांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना उद्युक्त करण्यात आले आहे.  लस  पुरवठा वेळेवर होण्याच्या दृष्टीने , लस उत्पादक आणि खाजगी रुग्णालयांशी नियमित समन्वय साधण्यासाठी 2/3 सदस्यांचा समर्पित चमू स्थापन करण्याचा सल्ला राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आला आहे.