राज्यपालांच्या भाषणावेळी सत्ताधा-यांचा गोंधळ; ‘राज्यपाल हटाव’च्या घोषणा

Image

मुंबई ,३ मार्च / प्रतिनिधी :-राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत असताना सुरुवातीला राज्यपाल आपले अभिभाषण करत असतात. त्यांच्या भाषणानंतर कामकाजाला सुरुवात होते. मात्र, राज्यपालांच्या या भाषणावेळीच सत्ताधा-यांकडूनच मोठा गोंधळ झालेला पहायला मिळाला. या गोंधळामुळे राज्यपालांनी आपले भाषण अर्ध्यावरच थांबवले आणि ते निघून गेले. विधी मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे.

Image

त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याबरोबर सत्ताधाऱ्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाची घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजनेही मग ‘नवाब मलिक हाय हाय’च्या घोषणा दिल्या.

विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले. सभागृहातील घोषणाबाजीमुळे राज्यपालांनी भाषण गुंडाळले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि जोतिबा फुलेंचा अपमान केल्याचा ठपका ठेवत राज्यपालांविरोधात सत्ताधारी पक्ष विधीमंडळात आक्रमक झाल्याचे दिसून आले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधा-यांकडून राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’ अशा घोषणाही देण्यात आल्या.

या प्रकरणावर आपली भूमिका मांडताना काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे की, शिवरायांच्या उल्लेख एकेरी केल्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल. अशा पद्धतीची भूमिका घेऊन तसा कायदेशीर प्रस्तावही आणला जाणार आहे. या प्रकारे छत्रपतींचा अपमान आणि फुले दांपत्याबाबतचे आक्षेपार्ह वर्तन राज्यपालांना शोभेसे नाहीये. त्याबाबत भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट करावी.