बॉम्बे हायकोर्ट हेच नाव रहाणार

‘मुंबई उच्च न्यायालयाचे’ नाव बदलून ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ मागणीची याचिका न्यायालयाने फेटाळली

नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाचे (Bombay High Court) नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय (Maharashtra High Court) करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाम यांच्या खंडपीठासमोर ही याचिका फेटाळण्यात आली आहे.

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय असे म्हणणे होते की, या केसमध्ये संसदीय प्रक्रिया आहेत. त्यात कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही, आणि जर हा बदल व्हायचा असेल, तर तो संसदीय किंवा कायदेमंडळाच्या माध्यमातून व्हायला हवा. त्यामुळे कोर्ट या प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. त्यामुळे ही याचिका कोर्टाने फेटाळली आहे. तसेच यामध्ये नागरिकांचे मुलभूत हक्कांचे उल्लंघन होत असेल, तर ते कोर्टात दाद मागू शकतात, या केसमध्ये तसा काही उल्लेख नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.

माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने १९६० सालीच एक आदेश काढून त्यात ‘बॉम्बे हायकोर्ट’ हे यापुढे ‘महाराष्ट्र हायकोर्ट’ म्हणून ओळखले जाईल, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. पण हा आदेश अंमलात आलाच नाही आणि बॉम्बे हायकोर्टचे नाव तसेच कायम राहिले. १९९५ साली बॉम्बेचे नाव बदलून मुंबई करण्यात आले. त्यामुळे आता बॉम्बे नावाचे शहरच अस्तित्वात राहिलेले नाही. पण उच्च न्यायालय मात्र ‘बॉम्बे’ नावानेच कायम आहे. २०१६ साली बॉम्बे हायकोर्टचे नाव बदलून मुंबई हायकोर्ट करण्याचे विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते. परंतू ते विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे आता बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करण्यात यावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

दरम्यान, बॉम्बे’ हे नाव बदलून मुंबई जरी करण्यात आले असले तरी कोर्टाचा उल्लेख मात्र बॉम्बे हायकोर्ट असाच करण्यात येतो. त्यासंदर्भात आता काही नवीन हालचाली होतात का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.